शेतकऱ्यांच्या खात्यात ९ ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा करा, अन्यथा..
By राजाराम लोंढे | Published: July 13, 2022 05:19 PM2022-07-13T17:19:03+5:302022-07-13T17:36:38+5:30
अनुदान तातडीने दिले नाहीतर ही फौज घेऊन मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही.
राजाराम लोंढे
कोल्हापूर : नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ९ ऑगस्टपूर्वी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा करा अन्यथा क्रांतीदिनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोको करू, असा इशारा ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या सरकारला दिला.
प्रोत्साहनपर अनुदान तातडीने द्या, मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता द्या, एफआरपीच्या तुकड्याचा घेतलेला निर्णय रद्द करा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. आज, बुधवारी सकाळपासूनच जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता, मात्र या पावसातही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी दसरा चौकात जमा झाले होते. ‘कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा... विजय असो’ अशा घोषणा देत भरपावसात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. शिष्टमंडळाच्यावतीने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
ब्राझीलमध्ये दुष्काळ असल्याने साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे भारतातील साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. इथेनॉल निर्मितीही फायदेशीर ठरत असल्याने कारखानदारांना चांगले पैसे मिळत आहेत. त्यामुळे आमचा दुसरा हप्ता तातडीने द्या. आघाडी सरकारने एफआरपीच्या तुकड्याचा घेतलेला निर्णय रद्द करा, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
..मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही
‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले, भरपावसात ‘स्वाभिमानी’ची ही फौज गोळा झाली आहे, अनुदान तातडीने दिले नाहीतर ही फौज घेऊन मंत्रालयावर येण्यास वेळ लागणार नाही. अनिल मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे, अजित पोवार, सागर संभूशेट्टे आदी उपस्थित होते.