अंगणवाडी सेविकांचे थकीत मानधन खात्यावर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 06:04 PM2020-06-24T18:04:50+5:302020-06-24T18:07:19+5:30
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे या दोन महिन्यांतील थकलेले मानधन अखेर मंगळवारी खात्यावर जमा झाले आणि सेविका मदतनिसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्ह्यातील आठ हजार ७३८ कर्मचाऱ्यांना १० कोटी ६६ लाख तीन हजार ६०० रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. हे मानधन थकीत राहिल्याबद्दल लोकमतने वृत्त दिले होते.
कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे या दोन महिन्यांतील थकलेले मानधन अखेर मंगळवारी खात्यावर जमा झाले आणि सेविका मदतनिसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्ह्यातील आठ हजार ७३८ कर्मचाऱ्यांना १० कोटी ६६ लाख तीन हजार ६०० रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. हे मानधन थकीत राहिल्याबद्दल लोकमतने वृत्त दिले होते.
अंगणवाड्या बंद असतानाही कोरोना साथीच्या काळात रस्त्यावर उतरून प्रशासनाला हातभार लावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल व मे महिन्यांतील मानधनच मिळालेले नव्हते. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक चणचण असतानाही मानधन मिळत नसल्याने संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाद्वारे प्रशासनावर रोष व्यक्त केला होता.
वित्त विभाग आणि कोषागार कार्यालयातील दिरंगाईमुळे प्रत्यक्षात बिले निघण्यास उशीर होत होता. अखेर मंत्रालय पातळीवर सूत्रे हलल्यानंतर मानधनाची देयके काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. मंगळवारी प्रत्यक्ष खात्यावर मानधनाची रक्कम जमा झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या अडचणीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळणारे मानधन
- सेविका ८०००
- मदतनीस ४२००
- जिल्ह्यातील अंगणवाड्या ४ हजार ३६९
- मिळालेली थकीत मानधनाची रक्कम
- सेविका ६ कोटी ९९ लाख ४ हजार
- मदतनीस ३ कोटी ६६ लाख ९९ हजार ६००
कायमच प्रतीक्षा
गेले वर्षभर या ना त्या कारणाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनासाठी ताटकळत राहावे लागले आहे. किमान दोन ते तीन महिने थकवल्यानंतरच मानधन मिळत आहे. नोव्हेंबर ते जानेवारीचे मानधन फेब्रुवारीत, फेब्रुवारीचे एप्रिल तर एप्रिल व मे महिन्यांचे मानधन आता जून संपत आला असताना मिळाले आहे. कामाचा व्याप वाढवत असताना मानधनाच्या बाबतीत मात्र कायमच अन्याय केला जात असल्याची भावना अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आहे.