कर्जमाफीचे पावणेपाच कोटी कोल्हापूर जिल्ह्यातील बाराशे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:08 AM2017-11-02T11:08:53+5:302017-11-02T11:23:16+5:30
राज्य सरकारच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँक व बँक आॅफ इंडियाकडे पात्र ११८२ शेतकऱ्यांचे ४ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.
कोल्हापूर ,दि. ०२ : राज्य सरकारच्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँक व बँक आॅफ इंडियाकडे पात्र ११८२ शेतकऱ्यांचे ४ कोटी ७४ लाख ८८ हजार रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला.
गेली पाच महिने कर्जमाफीचे घोंगडे भिजत राहिले आहे. आॅनलाईन अर्ज, त्यानंतर निकषांनुसार छाननी, त्यात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्ष कर्जमाफीस विलंब होत गेला. विरोधकांबरोबरच शेतकऱ्यांमधूनही कर्जमाफीबद्दल असंतोष व्यक्त केल्याने शासकीय यंत्रणा हडबडली.
गेल्या आठ दिवसांत नवीन यंत्रणा कामाला लावून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर टाकण्यास सुरुवात केली. तालुका पातळीवर त्याची छाननी केल्यानंतर तातडीने पैसे वर्ग करण्याची सहकार विभागाची तयारी आहे.
मंगळवारी आयटी विभागाने पात्र ठरविलेल्या याद्यांनुसार राज्य सरकारने आयसीआसीआय बँक, पुणे येथे राज्यातील ८९६ कोटी रुपये जमा केले. तेथून प्रत्येक जिल्हानिहाय पात्र शेतकरी व त्यांचे पैसे अशा याद्या जिल्हा बँका व राष्ट्रीय बँकांना पाठविण्यात आल्या.
कोल्हापूर जिल्हा बँकेलाही मंगळवारी पैसे आले पण काही तांत्रिक अडचणीमुळे ते वर्ग झाले नाही. बुधवारी पूर्तता केल्यानंतर दुपारी १०३२ शेतकऱ्यांचे ३ कोटी ७९ लाख रुपये वर्ग झाले. त्याचबरोबर बँक आॅफ इंडियाकडील १५० शेतकऱ्यांचे ९५ लाख ८८ हजार रुपये जमा झाले.
कर्जमाफीच्या याद्यातील गोंधळामुळे पैसे कधी येणार याविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. बाराशे शेतकऱ्यांचे का असेना पण पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दुसरी ग्रीन यादी गुरुवारी पोर्टलवर प्रसिद्ध होण्याची शक्यता असून त्याचे कामही जलदगतीने करण्याची तयारी सहकार विभागाने केली आहे.
जुलै २०१७ परतफेड करणारेच पात्र
प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी सन २०१५-१६ व सन २०१६-१७ या दोन्ही वर्षांतील कर्जाची जुलै २०१७ अखेर परतफेड करायची आहे; पण ऊसपट्ट्यात परतफेडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत जिल्हा बॅँकांसह सर्वच यंत्रणेने सातत्याने सहकार विभागाला कळविले तरी आता यावर विचार करण्यास ते तयार नाहीत.
अनुदान योजनेची माहिती भरताना जुलै २०१७ पर्यंत पैसे भरले की नाही? ज्यांनी भरले त्यांनाच पात्र म्हणून पुढे याद्या पाठवा, अशा स्पष्ट सूचना सहकार विभागाला वरिष्ठ कार्यालयाकडून आल्याने गुंता वाढणार आहे.
असे जमा झालेत पैसे
बँकेचे नाव शेतकऱ्यांची संख्या रक्कम
जिल्हा बँक १०३२ ३ कोटी ७९ लाख
बँक आॅफ इंडिया १५० ९५ लाख ८८ हजार