कोल्हापूर बाजार समितीत कोट्यवधीच्या ठेवी, सुविधांची वाणवा; रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शेतीमालावर धुळीचे थर
By राजाराम लोंढे | Published: December 30, 2022 01:17 PM2022-12-30T13:17:18+5:302022-12-30T13:22:27+5:30
धुळीचे लोट पसरत असल्याने भाजीपाला, गुळासह सर्व शेतीमालावर धुळीचे थर
राजाराम लोंढे
कोल्हापूर : गेली अडीच वर्षे बाजार समितीला तसे कारभारीच नाहीत. अशासकीय मंडळाने आपण काटकसरीचा कारभार कसा करतो?, हे दाखवून नेत्यांकडून पाठ थोपटून घेण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे समितीच्या बँकेत कोट्यवधीच्या ठेवी आहेत, मात्र सुविधा देण्यात हात आखडता घेतला, त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. समिती आवारात चोवीस तास धुळीचे लोट पसरत असल्याने भाजीपाला, गुळासह सर्व शेतीमालावर धुळीचे थर साचलेले असतात.
समितीमधील अडते, व्यापाऱ्यांकडून कर घेतला जातो, त्याबदल्यात त्यांना सोयी-सुविधा देणे समिती प्रशासनाला बंधनकारक आहे. मात्र, त्याकडे गेली अडीच वर्षे दुर्लक्ष केले आहे. समितीची रोजची उलाढाल सरासरी साडेचार कोटींची आहे. त्यासह इतर बाबींतून समितीला रोज ४ लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी १० टक्केही सोयी-सुविधांवर खर्च केला जात नाही.
संचालक मंडळ गेल्यापासून अडीच वर्षांत समितीच्या ठेवीत साडेआठ कोटीने वाढ झाली आहे. बँकेत कोट्यवधीच्या ठेवी आहेत, मात्र सुविधांसाठी एक रुपयाही खर्च केलेला नाही. रस्त्यांची अवस्था इतकी दयनीय झाली आहे, एखादे वाहन गेले की धुळीचे लोट उसळतात. समिती आवारात रोज सरासरी १३०० वाहने येतात. त्यामुळे आवारात धुळीचे लोट कधी थांबतच नाहीत. हीच धूळ शेतीमालावर जाऊन बसते. त्याचा परिणामही प्रतीवर होतो, परिणामी दराला फटका बसतो. समितीच्या प्रशासकीय इमारतीवरही धुळीचे थर बसले आहेत.
बोळ अरुंद होऊ लागले
समितीमधील दोन रस्त्यांना जोडणारे अनेक बोळ आहेत, त्या बोळांची अवस्था तर फारच वाईट आहेत. ते हळूहळू अरुंद होऊ लागले आहेत.
समिती आवार झुडपांनी व्यापला
समिती आवारात अस्वच्छता आहेच, त्याचबरोबर अनेक ठिकाणी झुडपे वाढल्याने रस्तेच गायब झालेले दिसतात. काही अडत दुकानांचे फलकही दिसत नाहीत.
कारभारी येणार तरी कधी?
बाजार समित्यांच्या निवडणुका कोरोनापासून लांबणीवर पडल्याने कामकाज पुरते ठप्प आहे. प्रशासकीय मंडळावर काम करण्याच्या मर्यादा येतात. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असती. मात्र, ग्रामपंचायती निवडणुकीमुळे प्रक्रिया थांबल्याने नवीन कारभारी कधी येणार? याविषयी उत्सुकता आहे.
दृष्टिक्षेपात बाजार समिती :
रोजची उलाढाल : ४.५० कोटी
एकूण रोजचे उत्पन्न : ४.६५ लाख
समिती येणाऱ्या वाहनांची संख्या : सरासरी १३००.