कोल्हापुरात दिवसभर निरुत्साही वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:23 AM2021-05-17T04:23:28+5:302021-05-17T04:23:28+5:30
कोल्हापूर : कोल्हापुरात रविवारी दिवसभर मनात कोरोनाची भीती, पावसाची रिपरिप आणि निरुत्साही वातावरण लोकांनी अनुभवले. त्यामुळे लोकांनी घरातून ...
कोल्हापूर : कोल्हापुरात रविवारी दिवसभर मनात कोरोनाची भीती, पावसाची रिपरिप आणि निरुत्साही वातावरण लोकांनी अनुभवले. त्यामुळे लोकांनी घरातून बाहेर पाय काढला नाही.
रविवार आणि लॉकडाऊन असल्याने अनेकांची सकाळ साडेआठ वाजल्यानंतर सुरू झाली. लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने अगोदरच जाहीर केले होते. तरीही काही बहाद्दर सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले. सात वाजल्यापासूनच उपनगरांत पोलिसांचे पथक सायरन वाजवत गस्त घालत होते. फिरायला आलेल्या लोकांना त्यांनी पकडून नेल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर कारवाईची धास्ती वाढली. त्यामुळे सहज चौकात चक्कर मारून येतो म्हणून बाहेर पडणारे घरातच लॉक झाले. एका बाजूला पोलीस कारवाईची भीती असताना पावसानेही दिवसभर चांगलाच पहारा दिला. जोरदार वारे आणि रिपरिप सुरू राहिल्याने शहरवासीयांना घरबाहेर जायची इच्छा झाली नाही. सकाळचा काही काळ वगळता दिवसभर शहरात वातावरण काळवंडलेले राहिले. त्यामुळेही निरुत्साह वाढला. नाश्टा, जेवण यासह विविध पदार्थ करून खाणे, वृत्तपत्र वाचन, टीव्ही पाहणे असा दिनक्रम राहिला. टीव्हीवर पण कोरोना, ऑक्सिजन मिळाला नाही, गंगा नदीत मृतदेह सोडले अशा नकारात्मक बातम्यांचा भरणा जास्त होता. त्यामुळे अनेकांनी तारक मेहताचा उलटा चष्मा पाहून मन रिझवले. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळेही अस्वस्थतेत भर पडली.