वीज कनेक्शन मिळत नसल्याच्या नैराश्येतून प्रकार -शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:43 PM2019-05-16T23:43:10+5:302019-05-16T23:44:42+5:30
नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन
शिराळा : नाटोली (ता. शिराळा) येथील सुखदेव आनंदा पाटील (वय ५४) या शेतकºयाने, वीज वितरण कंपनीकडे अनेक महिने हेलपाटे घालूनही शेती वीज पंपासाठी वीज कनेक्शन मिळत नाही, या कारणावरून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवार, दि. १६ रोजी सकाळी सात वाजता घडली.
सुखदेव पाटील हे आपली आई, पत्नी, दोन मुली, लहान मुलगा, भाऊ, भावजय अशा परिवारासह नाटोली येथे राहतात. एकत्रित कुटुंबाची ८ एकर शेतजमीन आहे. शेतामध्ये त्यांनी दोन वर्षांपूर्वी पाईपलाईन केली असून, वीज वितरण कंपनीकडे शेती पंपासाठी थ्री फेज कनेक्शनसाठी मागणी केली होती.
वीज कनेक्शन मिळावे, यासाठी ते शिराळा, इस्लामपूर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे वारंवार हेलपाटे घालत होते; मात्र अधिकारी वर्गाकडून काहीही कारणे सांगून बोळवण करण्याचा प्रयत्न केला जात होता. याचबरोबर शेतात पाणी नसल्याने उसाचे पीक वाळून गेले. वीज कनेक्शन नसल्यामुळे हातचे उसाचे पीक पाण्याविना वाळल्यामुळे होणारा आर्थिक फटका ही गोष्ट त्यांना सहन झाली नाही.
त्यामुळे गुरुवारी सकाळी सुखदेव व त्यांची पत्नी शेतात गेले होते. त्यावेळी शेतातील वस्तीवरील शेडमध्ये त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. जवळच असणाºया त्यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने, त्यांच्या शेडच्या काही अंतरावर असणाºया वस्तीतील नागरिकांनी त्वरित धाव घेतली व सुखदेव यांना शिराळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले; मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.
शेतकरी संतप्त
शिराळा तालुक्यात वीज कनेक्शन मिळत नाही म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना घडली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीबाबत संतापाची लाट शेतकरी व नागरिकांत पसरली आहे. महावितरणने शेतकऱ्यांना त्वरित वीज कनेक्शन दिले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा शेतकरी संघटनांनी इशारा दिला आहे.