‘झूम’वर उपमहापौरांना तीन तास रोखले
By admin | Published: June 8, 2015 12:21 AM2015-06-08T00:21:32+5:302015-06-08T00:48:23+5:30
झूममधील कचऱ्याची दुर्गंधी : तीन तासांनी आयुक्त आल्यानंतर सुटका; लाईन बझारमधील संतप्त नागरिकांकडून प्रशासन धारेवर
कोल्हापूर : लाईन बझार येथील झूम कचरा प्रकल्पातून रविवारी सकाळी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी येथे येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्या. यानंतर मनधरणी करण्यासाठी सकाळी आठच्या सुमारास आलेले स्थानिक नगरसेवक चंद्रकांत घाटगे व उपमहापौर मोहन गोंजारे तसेच मुख्य आरोग्य निरीक्षकांसह आलेल्या अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास घेराव घालून रोखून धरले. अकरा वाजता आयुक्त पी. शिवशंकर यांनी घटनास्थळी भेट देऊन येथील कचऱ्याचा लवकरच उठाव करू, असे आश्वासन दिल्यानंतर उपमहापौरांसह या अधिकाऱ्यांची सुटका झाली.
गेल्या तीन वर्षांपासून झूम प्रकल्पातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेली नाही. या कचऱ्याचा वास परिसरात नेहमी दरवळत असतो. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा मोर्चा आंदोलने करून नागरिकांनी झूमविरोधात आक्रोश केला.
यातच गेल्या दोन दिवसांपासून लाईन बझार परिसरात पावसानंतर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. नागरिकांनी तक्रार करूनही महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यातच पावसामुळे कचऱ्यातून निघणारे काळे पाणी (लिचड) बाहेर जाण्यासाठी झूमशेजारीच चर मारण्यात आली आहे. त्यामुळे कीटक व डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. परिणामी चिडलेल्या नागरिकांनी सकाळी साडेसात वाजता झूम येथे कचरा ढकलण्याचे सुरू असलेले काम बंद पाडले. तसेच कचऱ्याच्या गाड्या रोखून धरल्या.
नागरिकांची मनधरणी करण्यासाठी स्थानिक नगरसेवक चंद्रकांत घाटगे व त्यानंतर उपमहापौर मोहन गोंजारे, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर आले. लवकरच येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून तो हलविला जाईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. मात्र नागरिकांनी आयुक्तांनी येऊन परिस्थितीची पाहणी केल्याखेरीज कोणासही येथून न सोडण्याचा निर्धार केला. तब्बल तीन तास उपमहापौरांसह अधिकाऱ्यांना नागरिकांनी धारेवर धरले. आयुक्त पी. शिवशंकर यांनी अकराच्या सुमारास झूम प्रकल्पास भेट दिली. त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेतले. काळे पाणी (लिचड) बाहेर जाण्यासाठी मारलेली चर तत्काळ बुजविण्याचे त्यांनी आदेश दिले. उघड्या कचऱ्यावर औषध फवारणी करून डास व इतर कीटक तयार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना आरोग्याधिकाऱ्यांना दिल्या. आयुक्तांनी लवकरच येथील कचरा हटविण्यात येईल. यानंतर येथे थेट कचऱ्याची साठवूणक न करता त्यावर तत्काळ प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन दिले. यानंतर अधिकारी व लोकप्रतिनिधींची सुटका झाली. यावेळी सुनील जाधव, अभिजित कवठेकर, नितीन कवठेकर, राजेंद्र जाधव, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवख्या अधिकाऱ्याची अरेरावी
ठोक मानधनावरील आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर याने येथील नागरिकांना दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. निखिल याचे वडीलही आरोग्य विभागाच्या सेवेत आहेत. कायम नोकरीत नसतानाही नागरिकांशी उद्धट व दमदाटीची भाषा करणाऱ्या निखिल पाडळकर याला नागरिकांनीही चांगलेच धारेवर धरले. आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे पाडळकर पिता-पुत्राच्या कारनाम्याबाबत नागरिकांनी तक्रार केली. तसेच निखिल पाडळकर याला समज द्यावी, असा प्रकार पुन्हा घडल्यास सेवेतून कमी करण्याची मागणी नागरिकांनी केली.