मद्यधुंद पोलिसांची पोलीस उपअधीक्षकांना धक्काबुक्की, शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:15 AM2021-03-30T04:15:50+5:302021-03-30T04:15:50+5:30
कोल्हापूर : उघड्यावर मद्यप्राशन करत दंगामस्ती करणाऱ्या पोलिसांना हटकणाऱ्या शहर पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा ...
कोल्हापूर : उघड्यावर मद्यप्राशन करत दंगामस्ती करणाऱ्या पोलिसांना हटकणाऱ्या शहर पोलीस उपधीक्षक मंगेश चव्हाण यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला. महामार्गच्या दोघा पोलिसांसह एकूण तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात रविवारी सकाळी गुन्हा नोंद झाला. पोलीस अधिकाऱ्यांवरच हात उगारण्याचे धाडस पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक चव्हाण यांचे अंगरक्षक प्रवीण प्रल्हाद पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महामार्ग पोलीस कर्मचारी बळवंत श्यामराव पाटील (वय ५१, रा. पोलीस मुख्यालय, कोल्हापूर), राजकुमार शंकर साळुंखे (५३, रा. बेडेकर प्लाझा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांच्यासह जितेंद्र अशोक देसाई (३६, रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) या तिघांवर महाराष्ट्र दारू अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीच्या वेळी जमावबंदी लागू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ओपन बार, अवैध व्यवसायांवर कारवाईचा धडाका सुरू केला. शनिवारी मध्यरात्री पोलीस उपअधीक्षक चव्हाण हे दोन कर्मचाऱ्यांसह रात्रगस्तीवर होते. त्यावेळी कसबा बावडा येथील शंभरफुटी रोड परिसरात उघड्यावर दोन पोलिसांसह एकूण तिघेजण मद्यप्राशन करून दंगामस्ती करत होते. उपअधीक्षक मंगेश चव्हाण, अंगरक्षक प्रवीण पाटील यांनी त्यांना हटकले, त्यावेळी नशेतील त्या पोलिसांनी उपअधीक्षक चव्हाण व पोलीस कर्मचारी पाटील यांच्याशी वादावादी करत शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. संबंधित प्रकार चव्हाण यांनी रात्रीच पोलीस अधीक्षक बलकवडे यांना सांगितला. त्यांनी मद्यधुंद तिघांवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार तिघांवरही शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
मद्यधुंद पोलिसांची वैद्यकीय तपासणी
मद्यधुंद तिघा पोलिसांना गाडीत घालून रविवारी पहाटे शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणले. त्यांची सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर गुन्हे नोंदवून तिघांनाही नोटीस बजावली.
कारवाईसाठी महामार्ग अप्पर पोलीस महासंचालकांशी पत्रव्यवहार : अधीक्षक बलकवडे
घडलेला प्रकार हा खूपच गंभीर असून संबंधित दोघांनी पोलीस उपअधीक्षकांची माफी मागितल्याने त्यांच्यावर सौम्य कारवाई झाली आहे. परंतु, त्यांच्यावर कारवाईसाठी महामार्ग विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांशी आपण पत्रव्यवहार केल्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. पत्रव्यवहारामध्ये दोन्हीही पोलिसांना पूर्ववत जिल्हा पोलीस दलातील सेवेत आणण्याची मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.