आजऱ्यात ७५ हजारांची लाच घेताना नायब तहसीलदार व तलाठी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:36+5:302021-07-07T04:29:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आजरा : आजऱ्याचे महसूल नायब तहसीलदार तथा उपलेखापाल वर्ग - ३ चे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आजरा : आजऱ्याचे महसूल नायब तहसीलदार तथा उपलेखापाल वर्ग - ३ चे संजय श्रीपती इळके (वय ५२, रा. उत्तूर, ता. आजरा) व तलाठी राहुल पंडितराव बंडगर (वय ३३, जिजामाता कॉलनी, आजरा, मूळ गाव महाडिक कॉलनी, प्लॉट नं. २७, ई वार्ड, कोल्हापूर) या दोघांना ७५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. देऊळवाडी (ता. आजरा) येथील वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्याचा प्रस्ताव तयार करण्यासाठी या दोघांनीही लाचेची मागणी केली होती. आजरा तालुक्यातील गेल्या वर्षभरातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही मोठी कारवाई आहे.
या कारवाईनंतर आजऱ्यातील सर्वच शासकीय कार्यालयांत शुकशुकाट पसरला होता. देऊळवाडी (ता. आजरा) येथील गट नंबर २० मधील ३ एकर जमिनीपैकी २ एकर जमीन मूळ मालकाकडून तक्रारदार यांनी नोटरी करून घेतली आहे. ही वर्ग - २ ची जमीन वर्ग - १ करण्याकरिता १ लाख ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ७५ हजार रुपये देण्याचे निश्चित केले होते. सोमवारी ही रक्कम प्रशासकीय इमारतीमधील तहसील कार्यालयाच्या इमारत परिसरात देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. सोमवारी सकाळी लाच मागितल्याची तक्रार दिली व तक्रारी पाठोपाठ तहसील कार्यालय परिसरात सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक सतीश मोरे, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक सुनील घोसळकर, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश माने यांनी ही कारवाई केली.
फोटो :
- संजय इळके : ०५०७२०२१-गड-१०
- राहूल बंडगर : ०५०७२०२१-गड-११