देसाई, नेजदार यांचेही नगरसेवकपद रद्द

By admin | Published: May 7, 2016 01:09 AM2016-05-07T01:09:35+5:302016-05-07T01:14:10+5:30

आणखी पाचजण गॅसवर : जात पडताळणी समितीच्या दणक्यामुळे कारवाई

Desai, Nejdar also canceled the corporation | देसाई, नेजदार यांचेही नगरसेवकपद रद्द

देसाई, नेजदार यांचेही नगरसेवकपद रद्द

Next

कोल्हापूर : महानगरपालिका सभागृहातील ताराराणी आघाडीचे नीलेश जयकुमार देसाई आणि कॉँग्रेसचे संदीप विलास नेजदार यांचे कुणबी जातीचे दाखले अवैध ठरल्याने त्यांना नगरसेवक पदावरून पायउतार व्हावे लागले. देसाई व नेजदार यांना त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आल्याचा आदेश शुक्रवारी सायंकाळी बजावण्यात आला. जातीचे दाखले अवैध ठरल्यामुळे नगरसेवक रद्द होणाऱ्यांची संख्या आता चारवर पोहोचली आहे. अद्याप महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह पाच नगरसेवकांच्या जातीची पडताळणी बाकी असून, त्याचा काय निकाल येतो, याकडे संपूर्ण महापालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेली महानगरपालिकेची निवडणूक जातीच्या बोगस दाखल्यावर लढविणाऱ्या नगरसेवकांना, तसेच त्यांच्या राजकीय पक्षांना विभागीय जात पडताळणी समितीने चांगलाच दणका दिला आहे. अद्याप पाच नगरसेवकांचे निर्णय समितीने दिलेले नाहीत; परंतु त्यापैकी किमान दोन तरी नगरसेवकांना दणका बसण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे. एकाच सभागृहात एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवकपद रद्द होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.
शुक्रवारी सायंकाळी विभागीय जात पडताळणी समितीने नीलेश जयकु मार देसाई (ताराराणी), संदीप विलास नेजदार (कॉँग्रेस), सविता सतीश ऊर्फ राजू घोरपडे (ताराराणी), अफजल कुतबुद्दीन पिरजादे (राष्ट्रवादी) या चार नगरसेवकांच्या जातीच्या दाखल्यावर निकाल दिला. त्यापैकी नीलेश देसाई व संदीप नेजदार यांचे दाखले अवैध ठरविले, तर घोरपडे व पिरजादे यांचे जातीचे दाखले वैध ठरविले. एका अहवालाद्वारे हा निकाल महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना समितीने पाठविला. त्यानंतर


(पान १ वरून) आयुक्त शिवशंकर यांनी सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांच्याशी चर्चा करून तत्काळ देसाई व नेजदार यांना त्यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचे आदेश बजावले. आता महापौर अश्विनी रामाणे, दीपा मगदूम (कॉँग्रेस), सचिन पाटील, हसिना फरास (राष्ट्रवादी), तर किरण शिराळे (ताराराणी) अशा पाचजणांच्या जातीच्या दाखल्यांची पडताळणी व्हायची आहे. एकाच सभागृहातील तब्बल चारजणांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे पाचहीजणांची हवा टाईट झाली असून, त्यांचे धाबे दणाणले आहेत. या पाचपैकी कोणावर गंडांतर येणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे. महापौर रामाणे वगळता अन्य कोणीही मनपात फिरकलेले नाहीत.

नगरसेवकपद रद्द होणाऱ्यांची संख्या चारवर
दोनच दिवसांपूर्वी विभागीय जात पडताळणी समितीने वृषाली दुर्वास कदम व संतोष बाळासो गायकवाड यांचे जातीचे दाखले अवैध ठरविल्यामुळे त्यांना नगरसेवकपद गमवावे लागले होते. पाठोपाठ शुक्रवारी संदीप नेजदार व नीलेश देसाई यांनाही नगरसेवकपद गमवावे लागले. जातीच्या बोगस दाखल्यावर निवडणूक लढविण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. त्यांची बनवेगिरी अवघ्या सहा महिन्यांतच उघड झाली. चौघांना राजकीय ‘बॅकफूट’वर जावे लागले. नगरसेवकपद रद्द झालेल्यांमध्ये कॉँग्रेसचे दोन, तर भाजप व ताराराणी आघाडीच्या प्रत्येक एकाचा समावेश आहे. संतोष गायकवाड व नीलेश देसाई यांच्या जातीच्या दाखल्या-बाबत तक्रारी होत्या.

Web Title: Desai, Nejdar also canceled the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.