‘शहर वाहतूक’च्या नवीन इमारतीस प्रशासनाचाच खोडा
By admin | Published: April 19, 2015 11:55 PM2015-04-19T23:55:27+5:302015-04-20T00:02:48+5:30
स्वजागेत स्थलांतर कधी ? : एक वर्षापासून पाठपुरावा करूनही दुर्लक्ष
एकनाथ पाटील/ कोल्हापूर : शहर वाहतूक शाखेचा पोलीस मुख्यालय येथील स्वत:च्या जागेत कार्यालय बांधण्याचा प्रस्ताव गेल्या एक वर्षापासून जिल्हा नियोजन समितीकडे धूळखात पडला आहे. जिल्हा प्रशासनानेच या प्रस्तावास खोडा घातल्याने या कार्यालयाची अवस्था ‘ना घर का, ना घाट का’ अशी आहे. कार्यालयाची दुरवस्थाजिल्हा पोलीस दलांतर्गत शहर वाहतूक शाखेचे कार्यालय सुरुवातीस महापालिका चौकातील इमारतीमध्ये सुरू करण्यात आले. ही जागा रस्ता रुंदीकरणामध्ये गेल्याने महापालिका प्रशासनाने या कार्यालयास १९९० मध्ये नागाळा पार्कातील जयंती नाल्याशेजारील पंप हाऊस जवळील गट नं. ८०२, सी वॉर्ड ची १२ बाय २३ हे शेडवजा खोली उपलब्ध करुन दिली. त्यामुळे या कार्यालयाचे नामांतर ‘शहर वाहतूक शाखा कार्यालय’ करण्यात आले. सध्या कार्यालयाच्या छताचे सिमेंट पत्रे जीर्ण झाले असून पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी गळते. त्यामुळे सरकारी किमती साहित्याचे व महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान होत आहे. कार्यालयाच्या आतील व बाहेरील फरशी खराब झाली आहे. इमारतीच्या उजव्या बाजूस असलेल्या दोन निलगिरीच्या झाडांची उंची मोठ्या प्रमाणात वाढून फांद्या अधिकच विस्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अपघात होऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच झाडांची मुळे इमारतीच्या खालून गेल्याने इमारतीच्या भिंतींना तडे जावून भेगा पडलेल्या आहेत.
४० लाखांचा इस्टिमेंट प्लॅन
शहरातील रहदारीस अडथळा ठरणारी तसेच मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणारी वाहने क्रेनद्वारे टोर्इंग करून या ठिकाणी आणली जातात. ती सुस्थितीत ठेवण्यासाठी पुरेशी जागा येथे नाही. कारवाई केलेली वाहने परत घेण्यासाठी तडजोड शुल्क भरण्यासाठी व इतर कार्यालयीन कामकाजासाठी अनेक नागरिक येथे येत असतात तसेच ४ पोलीस अधिकारी व १६१ पोलीस कर्मचारी व ५ महिला पोलीस कर्मचारी कामकाज करत आहेत. कार्यालयाच्या आवारात शौचालयाची सोय नसल्याने फार मोठी गैरसोय होत आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी या शाखेचे कार्यालय सक्षम असणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वत:ची सर्वसोयीनीयुक्त अशी सुसज्ज इमारत असणे आवश्यक असल्याने पोलीस मुख्यालय येथे पोलीस दलाची जागा विकसित करणे गरजेचे आहे. या ठिकाणी इमारत बांधणीसाठी सुमारे ४० लाख किमतीचा इस्टिमेट प्लॅन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करून तो निधी मंजुरीसाठी जिल्हा नियोजन समितीकडे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सादर केला आहे.
शहर वाहतूक शाखेचे कार्यालय पोलीस मुख्यालय येथील नियोजित जागेत बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे निधी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला आहे, परंतु त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
-आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक