मजुरीवाढीसाठी लवाद नेमणार
By admin | Published: December 28, 2016 12:14 AM2016-12-28T00:14:37+5:302016-12-28T00:14:37+5:30
प्रांत कार्यालयात निर्णय : खर्चीवाल्यांच्या प्रश्न पुन्हा लांबणीवर; कारखाने सुरू
इचलकरंजी : पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या रीतीनुसार लवाद समितीचे पुनर्गठन करून त्यातून खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसंदर्भात निर्णय करण्यात येईल. त्यासाठी व्यापक बैठक घेण्याचे प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. त्यामुळे मजुरीवाढीचा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला आहे.
दरम्यान, बैठकीनंतर यंत्रमागधारकांनी आपले कारखाने सुरू करण्याचे आवाहन केल्यामुळे यातून यंत्रमागधारकांच्या हाती काहीच लागले नसल्याची चर्चा सुरू होती.
यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळावी, यासाठी दहा दिवस ‘मी स्वाभिमानी कारखानदार’ या संघटनेच्यावतीने आमरण उपोषण करण्यात आले होते. सोमवारी (दि. २६) वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर बाळ महाराजांनी उपोषण मागे घेतले. त्यावेळी खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसंदर्भात चक्री उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, त्याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या आंदोलनाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तर मजुरीवाढीसंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकाही निष्फळ ठरल्याने हा प्रश्न निकालात निघणार की नाही, असा सवाल होता.
या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी बैठक घेतली. यावेळी यंत्रमागधारकांच्यावतीने सचिन हुक्किरे, अजय जावळे, बाळकृष्ण लवटे, अमोद म्हेतर, विकास चौगुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधींनी म्हणणे मांडताना आजवर झालेल्या विविध आंदोलनांमध्ये मार्ग काढण्यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व शासकीय प्रतिनिधी यांची लवाद समिती नेमली गेली आहे. या प्रश्नीही लवाद समितीचे पुनर्गठण करण्यात यावे आणि हा प्रश्न निकाली काढावा, असे सांगण्यात आले. त्यावर प्रांताधिकारी शिंगटे यांनी या समिती सदस्यांना कळवून समितीचे पुनर्गठण करून लवकरच व्यापक बैठकीद्वारे हा प्रश्न सोडविण्याचा निर्णय जाहीर केला. बैठकीनंतर अजय जावळे, सचिन हुक्किरे यांनी कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले. (वार्ताहर)
मंडप गायब : गोंधळ
खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीसंदर्भात चक्री उपोषणाची घोषणा झाली असताना गांधी पुतळा येथील उपोषणावेळी घातलेला मंडप गायब झाल्याने यंत्रमागधारकांचा गोंधळ उडाला. गांधी पुतळ्याजवळ यंत्रमागधारक जमल्याची माहिती मिळताच पोलिस तेथे आले. त्यांनी यंत्रमागधारकांना तेथून हुसकावून लावले. त्यामुळे त्यांनी थेट बाळ महाराजांच्या घराकडे मोर्चा वळविला व त्यांना खर्चीवाल्यांच्या प्रश्नाबाबत जाब विचारला. त्यावर या प्रश्नाबाबत चार दिवसांत तोडगा न निघाल्यास शुक्रवारी मेळावा घेणार असल्याचे बाळ महाराजांनी सांगितले. या सर्व गोंधळाच्या वातावरणामुळे आंदोलनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती.