इच्छुकांची ‘उतरवली’

By admin | Published: August 13, 2015 11:47 PM2015-08-13T23:47:44+5:302015-08-14T00:06:55+5:30

महापालिकेची कारवाई : ५५ डिजिटल फलक हटविले

'Desired' of the seekers | इच्छुकांची ‘उतरवली’

इच्छुकांची ‘उतरवली’

Next

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदारांना आवाहन व आकर्षित करणारे, पाठिंबा व्यक्त करणारे ५५ अनधिकृत फलक गुरुवारी महानगरपालिका व पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम राबवून काढून टाकले. शाहू स्मारक भवनच्या शेजारी एका कथित गुंडाचा फलक लावल्यामुळे पोलीस खात्याने त्याची गंभीर दखल घेऊन तो उतरविला होता. त्यानंतर ही मोहीम संपूर्ण शहरभर राबविण्याचा निर्णय घेऊन तातडीने कारवाईही सुरू केली. आॅक्टोबर महिन्यात महापालिकेची निवडणूक होत आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इच्छुकांनी शहरात डिजिटल फलक लावण्याचा सपाटाच लावला आहे. यातील अनेक फलक अनधिकृत आहेत. मतदारांना आवाहन, उमेदवारांना पाठिंबा, अशा आशयाचे हे फलक असून प्रत्येक प्रभागात दोन- तीन इच्छुक उमेदवारांनी फलक लावले आहेत. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असणाऱ्या कथित गुंड, मवाली, फसवणुकीतील गुन्हेगारांनीदेखील काही प्रभागांतून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यांनीही डिजिटल फलक उभारले आहेत. त्यामुळे संपूर्ण शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. गुरुवारी दुपारपासून गांधी मैदान, राजारामपुरी व ताराराणी मार्केट अशा तीन विभागीय कार्यालयांद्वारे एकाचवेळी कारवाई सुरू झाली. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी जनता बझार चौक, सायबर चौक, माउली पुतळा, शास्त्रीनगर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, उदयनगर, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, यादवनगर, वर्षानगर, आदी भागांत ही कारवाई करण्यात आली.
सायंकाळपर्यंत राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७, राजारामपुरी ठाण्याच्या हद्दीतील २३, शाहूपुरी ठाण्याच्या हद्दीतील १५ अनधिकृत फलक काढण्यात आले होते. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिका आणि पोलिसांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या या कारवाईचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Desired' of the seekers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.