सुनसान रस्ते.....घुसमटलेले श्वास....... दाटलेले गळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:22 AM2021-05-22T04:22:13+5:302021-05-22T04:22:13+5:30

कोल्हापूर : रात्री बारा वाजले तरी कोल्हापूर वाहतं असायचं. चौकाचौकातील कट्ट्यांवर गप्पा रंगायच्या. ...

Desolate roads ..... Intrusive breaths ....... Throat | सुनसान रस्ते.....घुसमटलेले श्वास....... दाटलेले गळे

सुनसान रस्ते.....घुसमटलेले श्वास....... दाटलेले गळे

googlenewsNext

कोल्हापूर : रात्री बारा वाजले तरी कोल्हापूर वाहतं असायचं. चौकाचौकातील कट्ट्यांवर गप्पा रंगायच्या. एकाच मोबाईलवर व्हिडिओ बघण्यात पोरं गुंग झालेली असायची. रुग्णालयांबाहेरही शांतता असायची. गेल्या वर्षी कोरोना विषाणूनं माणसाच्या आयुष्यातच विष कालवलं आणि हतबल माणसं पळ पळ पळताहेत ऑक्सिजन मिळवण्यासाठी... रेमडेसिविर इंजेक्शनसाठी... रुग्णालयातील जागेसाठी. पोलीसही खडा पहारा देताहेत घरातून कुणी बाहेर पडू नये म्हणून. रात्रीच्या वेळेचं कोल्हापूर या सगळ्या भीषण वास्तवाला अधिक गडद करणारं....

स्थळ.. १ मिरजकर तिकटी

नेहमी रात्री उशिरापर्यंत गवळ्यांची असणारी जाग. कुल्फीच्या गाड्यांभोवती पानाच्या दुकानांसमोरही असायची गर्दी. संभाजीनगर असो किंवा शिवाजी पेठ. इथूनच जायला लागतंय. त्यामुळं वर्दळ अगदी रात्री बारापर्यंत. आता मात्र सगळी तिकटी सुनसान. हुतात्मा स्तंभाभोवतीच्या कृत्रिम मशालीचंही तेज कमी झालेलं. वातावरण उदास.

स्थळ २ बिंदू चौक

२१०५२०२१ कोल बिंदू चौक

बिंदू चौक म्हणजे कोल्हापूरची शान. नूतनीकरण झाल्यानंतर इथं बसायला बक्कळ स्वच्छ जागा. त्यामुळे बिंदू चौकातील आसपासच्या गच्च घरातील माणसं वाऱ्याला नेहमी इथंच बसायची. बारकी पोरं तेवढ्याच जागेत तिथंही फुटबॉल खेळायची. आता मात्र इथले सगळे कट्टे सुनसान. चौकही शांतपणे पहुडलेला; मात्र पोलीस जागे आठ-दहा जण, जोडीला दोन-तीन पोलीस ताईही. सकाळी आठपर्यंत इथं थांबणार होत्या. समोरचं मेडिकलचं दुकान तेवढं उघडं. एवढ्यात लाल, निळा प्रकाश फेकत पोलिसांची एर्टिगा गाडी येते. पाठोपाठ एक सुमो. बंदोबस्त चोख चाललाय की नाही, हे बघितलं जातं. गाड्या निघून जातात. पुन्हा पोलीस जागेवर. मध्येच येणाऱ्या -जाणाऱ्याला हटकलं जातं. कार्ड दाखवलं की सोडलं जातं. चैतन्य हरवल्यासारखा चौक पुन्हा शांत शांत.

स्थळ ३ सीपीआर हॉस्पिटल

२१०५२०२१ कोल सीपीआर

गेटमधून आत जातानाच छाती दडपते. गेल्या वर्षभरात कोरोनामुळं याच परिसरात अनेकांनी अखेरचा श्वास घेतलेला. आत गेल्याूगेल्या उजव्या बाजूला कोरोना पॉझिटिव्ह वॉर्ड. एक पीपीई किटमधील सिस्टर दुसऱ्याला कसली तरी माहिती देत होत्या. बाहेर एखाद्‌दुसरा नातेवाईक बसलेला. आईला आणलेय म्हणाला.. ऑक्सिजनवर ठेवलंय. नऊ दिवस झालेत. रेमडेेसिविरची दोन इंजेक्शन्स दिलीत; पण अजून सुधारणा नाही. त्याच्या डोळ्यात पाणी. माझाही कंठ दाटलेला.

अनेकांना जीवनदान देणाऱ्या जुन्या वास्तूच्या मागे गेलो. रुग्णांच्या नातेवाइकांनी मिळेल तिथं जागा धरलेली. कोण घोरत होतं. कुणी बसलं होतं. पोरं टु व्हीलरवर स्टँड लावून बसलेली. सगळ्यांच्या मनात एकच भाव, माझ्या पेशंटला कधी एकदा घराकडं घेऊन जातो हाच. तिकडे आत साडेतीनशे जणांचे श्वास कोंडलेले. त्यांना ऑक्सिजन लावलेला.

‘लेका, तरणंताठं पोरगं घेऊन आलोय, धा दिस झाल्यात. गावाकडं म्हातारा एकटाच हाय घरात. कसला ह्याे रोग आला आणि माझ्या जीवाला घोर लागलाय’ म्हातारीनं डोळ्यात पाणी आणलं आणि मला पुढं थांबवेना. एवढ्यात वांय ...वांय... आवाज करत अम्ब्युलन्स आली आणि शांतता चिरत गेली, थेट अतिदक्षता विभागाकडं... आणखी एका घुसमटलेल्याला घेऊन.

स्थळ ४ दसरा चौक

२१०५२०२१ कोल दसरा चौक

चारही बाजूंनी धावणारी वाहनं कधीचीच थांबलेली. पूर्वी नेपाळी स्वेटर विकायचे तिथं पोलिसांनी खुर्च्या टाकलेल्या. येणाऱ्या-जाणाऱ्याची चौकशी. शाहू पुतळ्याच्या समोर उभारलं की, थेट व्हीनस कॉर्नरच्या पुढंपर्यंत सुनसान.... रिकामा रस्ता.. कधीही न बघितलेला असा. नेहमी कोकणाकडं जाणाऱ्या जड ट्रकचा आवाज नाही की दोस्ताला मागं घेऊन लिव्हर वाढवणाऱ्या भावाची बाईक नाही. सगळं कसं शांत शांत... काळ्याशार डोहासारखं... असंख्य प्रश्न सामावून घेतलेलं... पण उत्तर न सापडणारं....

Web Title: Desolate roads ..... Intrusive breaths ....... Throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.