क्षमता असूनही शिवसेनेला मर्यादित यश
By admin | Published: March 2, 2017 01:11 AM2017-03-02T01:11:03+5:302017-03-02T01:11:03+5:30
धनुष्यबाणाच्या गतीला खीळ : ‘किंगमेकर’ची भूमिका असली तरी आमदार, पक्ष पदाधिकाऱ्यांत एकजिनसीपणाचा अभाव
समीर देशपांडे-- कोल्हापूर ---हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अजूनही मनापासून प्रेम करणारा कट्टर शिवसैनिक, रस्त्यावर उतरून लढण्याची अजूनही शिल्लक असलेली वृत्ती आणि ग्रामीण भागात असलेले शिवसेनेचे पाच आमदार या जमेच्या बाजू असतानाही क्षमता असूनही शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मर्यादित यश मिळाले, असे म्हणावे लागेल. जरी शिवसेना सध्या ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असली तरी पक्षाचे आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यात एकजिनसीपणा दिसला असता तर ‘धनुष्यबाण’ आणखी सुसाट सुटला असता.
गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे सहा सदस्य होते. त्यांची संख्या वाढून आता दहा झाली. म्हणजेच केवळ चार जागा शिवसेनेला जादा निवडून आणता आल्या. यावेळी त्या-त्या भागातील आमदारांनी आपल्या आगामी विधानसभांचा विचार करीत स्थानिक पातळीवर कुठल्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार द्यायचा आणि कुठे द्यायचा नाही, याचे पद्धतशीर गणित घातले. आमदार प्रकाश आबिटकर यांनी तर भुदरगड तालुक्यात ‘धनुष्यबाणा’चे चिन्ह न घेता स्थानिक आघाडीच्या माध्यमातून विजय मिळविला. आबिटकर यांच्या आघाडीविरोधात दोन मतदारसंघांत शिवसेनेचे दोन उमेदवार निवडणूक लढवीत असल्याचे विचित्र चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने पाहावयास मिळाले. आजरा तालुक्यातही शिवसेना वेगवेगळ्या मतदारसंघांत वेगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभी होती.
आमदार चंद्रदीप नरके यांनीही काही मतदारसंघांत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला सहकार्य होईल, अशीच भूमिका घेतल्याची चर्चा आहे. आमदार सुजित मिणचेकर यांनीही स्थानिक आघाडीमध्ये समाविष्ट होत निवडणूक लढविली. शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांच्या विजयात मोलाचा वाटा असलेली बहुजन विकास आघाडी भाजपमध्ये गेल्याने पाटील यांची कोंडी झाली आणि अखेर त्यांना भाजपसोबत आघाडी करावी लागली.
शिवसेनेने ६७ पैकी ४० जागा लढविल्या. त्यांपैकी १० जागांवर विजय मिळाला, १० जागांवर शिवसेनेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत, तर ११ ठिकाणी शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच संगीता काशीद (यवलूज), अजित नरके (कोतोली), संग्रामसिंह कुपेकर (नेसरी), वीरेंद्र मंडलिक (बोरवडे) या शिवसेनेच्या चार उमेदवारांचा ६५ पासून १९८ पर्यंत इतक्या कमी फरकाने पराभव झाला आहे. हे चारीही उमेदवार म्हणजे शिवसेनेच्या संभाव्य विजयी उमेदवारांच्या यादीतील पहिल्या क्रमांकाची नावे होती. हे उमेदवार विजयी झाले असते तर शिवसेना ही कॉँग्रेस आणि भाजपच्या बरोबरीने १४ जागा जिंकत विभागून का असेना, पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनली असती.
(उद्याच्या अंकात : इतर पक्ष व आघाड्या)
‘आघाडीशिवाय पर्याय’चे गणित चुकले
कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे विजय देवणे, संजय पवार आणि मुरलीधर जाधव हे तीन जिल्हाप्रमुख आहेत. संजय मंडलिक हे सहसंपर्कप्रमुख आहेत. निवडणूक प्रक्रियेमध्ये हे सर्व एकत्र दिसत होते. मात्र तीच तळमळ अधिकाधिक जागांवर शिवसैनिकांना संधी देण्यामध्ये दिसली नाही. केवळ निवडणुकीपुरतेच नव्हे, तर इतर वेळीही शिवसेना संघटना आणि आमदार यांच्यातील संंबंध हे सुरक्षित अंतरावरचेच असल्याचे दिसून येते. येणाऱ्या विधानसभेचा विचार करीत जाईल तेथे शिवसेनेची शाखा उघडून कट्टर शिवसैनिकांची संख्या वाढविण्यापेक्षा तयार गट आणि त्यांचे नेते आपल्यासोबत कसे राहतील यासाठी ‘आघाडीशिवाय पर्याय नाही,’ असे म्हणत आपले विधानसभेचे गणित बसवत मगच हालचाली केल्या गेल्याने गेल्यावेळच्या शिवसेनेच्या जागांमध्ये केवळ चार जागांची वाढ झाली, हे वास्तव या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले.
तालुकातालुकावार विजयी
उभे उमेदवारउमेदवार
करवीर ०६०२
कागल ०५०२
हातकणंगले ०५०१
शिरोळ ०४०१
गडहिंग्लज०४००
पन्हाळा ०३०१
शाहूवाडी ०३०२
चंदगड ०३००
राधानगरी०२०१
भुदरगड ०२००
गगनबावडा०२००
आजरा ०१००
एकूण४०१०
पक्षांचा
लेखाजोखा--शिवसेना