Kolhapur: निधी असूनही कामे रेंगाळली, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची सद्य:स्थिती
By भारत चव्हाण | Updated: February 26, 2025 17:53 IST2025-02-26T17:49:14+5:302025-02-26T17:53:05+5:30
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

ताराबाई रोडवर उभारण्यात येत असलेल्या बहुमजली पार्किंग व भक्त निवास इमारतीचे काम अतिशय संथगतीने सुरू (छाया : आदित्य वेल्हाळ)
भारत चव्हाण
कोल्हापूर : महानगरपालिकेचे कोणतेही विकास काम निविदेत दिलेल्या मुदतीत पूर्ण होत नसल्याचे अनुभव प्रत्येक कामातून येत आहे. सन २०२० मध्ये ७९ कोटी ९६ लाख खर्चाच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास मान्यता झाली, परंतु चार वर्षे उलटली, तरी पहिल्या टप्प्यातीलच काम अद्याप अपूर्ण आहे. या कामावर कोणा अधिकाऱ्यांचे वैयक्तिक नियंत्रण नसल्यामुळे कामाची गती मंदावली असल्याने उर्वरित कामे पूर्ण कधी होणार, असा सवाल विचारला जात आहे.
एखाद्या व्यक्तीने स्वत:चे घर बांधायला काढले की, केव्हा एकदा पूर्ण होईल आणि त्या घरात राहायला जाईन, याची उत्सुकता लागून राहिलेली असते. पण, अंबाबाई मंदिर परिसर विकास कामांतर्गत होत असलेल्या तळमजल्यासह पाच मजले पार्किंग व सहा व सातव्या मजल्यावरील भक्तनिवासच्या इमारतीबद्दल महापालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्याला काहीच देणे-घेणे राहिलेले नाही. ठेकेदार कोल्हापूरचा आहे आणि त्यांनी तळमळ दाखविली, म्हणून तर पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे झुकलेले आहे.
पहिल्या टप्प्यातील काम एक वर्षात पूर्ण करायचे होते, आता पाच वर्षे उलटून गेली आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामही एक वर्षात पूर्ण करायचे आहे, पण पाच महिने होऊन गेल्यावर आता कुठे तिसऱ्या मजल्याचे स्लॅब जोडायला सुरुवात झाल्याचे सांगण्यात येते. जर अशीच कामाची गती असेल, तर काम पूर्ण होणार कधी आणि त्या इमारतीचा पर्यटक, भाविकांना उपयोग होणार कधी हा प्रश्न आहे.
निविदा, वर्क ऑर्डरमध्ये वर्ष सरले
पहिल्या टप्प्यातील काम पूर्णत्वाकडे गेले की दुसऱ्या टप्प्यातील कामाना निधी सोडला जातो. दुसऱ्या टप्प्यातील सुचविलेल्या कामांकरिता ४० कोटींचा निधी वितरीत करण्यास फेब्रुवारी २०२४ मध्ये मान्यता झाली. त्यानंतर आठ महिन्यांनी म्हणजेच दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी कामाची वर्कऑर्डर देण्यात आली. पाच महिन्यांनी कामाला सुरुवात झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यात ही कामे होणार
दुसऱ्या टप्प्यात नव्याने बांधलेल्या वाहनतळ इमारतीत तिसरा, चौथा, पाचवा मजल्यावर पार्किंग आणि सहाव्या व सातव्या मजल्यावर भक्त निवास, तसेच ५० लोक बसतील, असे उपहारगृह या कामांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला होता, परंतु फेब्रुवारीत कामाला सुरुवात झाली आहे.
गाडीअड्डा वाहनतळ सुरुवात नाही
व्हिनस कॉर्नरजवळील गाडीअड्डा येथे वाहनतळ विकसित करण्याच्या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील आराखड्यात समावेश आहे, परंतु या ठिकाणी अद्याप कामालाच हात लागलेला नाही.
कामावर नियंत्रणाचा अभाव
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंमलबजावणी करण्याकरिता अधिकाऱ्यांनी आठवडा, दोन आठवड्यातून एकदा पाहणी, आढावा बैठक घ्यायला पाहिजे, पण कोणाचेही या कामाकडे लक्ष नाही. कोणावर नियंत्रण राहिलेले नाही. वर्कऑर्डर झाली की, सगळ्यांचेच दुर्लक्ष होत आहे. निधी असूनही कामे रेंगळली आहेत.