निधीची तरतूद, तरी कोल्हापूर महापालिकेला रंकाळा महोत्सव, फुटबॉल, कुस्तीचा विसर
By भारत चव्हाण | Updated: March 3, 2025 15:51 IST2025-03-03T15:50:39+5:302025-03-03T15:51:14+5:30
संयोजन कोणी करायचे म्हणून टाळाटाळ

निधीची तरतूद, तरी कोल्हापूर महापालिकेला रंकाळा महोत्सव, फुटबॉल, कुस्तीचा विसर
भारत चव्हाण
कोल्हापूर : शहराच्या विकास कामांसह विविध सेवा सुविधा देण्याची प्राथमिक कर्तव्ये पार पाडत असतानाच विविध क्षेत्रातील खेळाडू, कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाला कुस्ती, फुटबॉल स्पर्धेचा तसेच रंकाळा महोत्सवाचा विसर पडला आहे. विशेष म्हणजे अंदाजपत्रकात तरतूद करूनदेखील संयोजन करायचं काेणी असं म्हणत अधिकाऱ्यांनी जबाबदारी टाळली जात आहे.
कोल्हापूर शहराला कला, क्रीडा, सांस्कृतिक परंपरेचा फार मोठा वारसा आहे. या वारसाचे जनत करणे आणि नवनवीन कलाकारांना, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच समस्त कोल्हापूरकरांचे मनोरंजन करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेऊन महानगरपालिकेकडून वार्षिक अंदाजपत्रकात विशिष्ट निधीची तरतूद केली जाते. रंकाळा महोत्सव आणि क्रीडा स्पर्धा असे दोन बजेटहेड देखील अंदाजपत्रकात आजही कायम आहेत.
रंकाळा महोत्सवात पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज, पंडित शिवकुमार शर्मा, गझल गायक पंकज उधास, गायक अजित कडकडे, उषा मंगेशकर, शुभा मुदगल, के. के., महालक्ष्मी अय्यर, कुणाल गांजावाला, सुधा चंद्रन यांच्या यांच्यासारख्या श्रेष्ठ कलाकारांच्या नृत्य, गायन, वादन, नृत्याविष्काराने कोल्हापूरकर तृप्त झाले. आता हा ‘रंकाळा महोत्सव’ गेल्या काही वर्षांपासून बंद पडला आहे.
कोल्हापूर शहरातील आवडा खेळ म्हणजे फुटबॉल व कुस्ती होय. या दोन्ही खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता महापौर चषक फुटबॉल स्पर्धा तसेच महापौर केसरी कुस्ती स्पर्धा भरविली जात होती. कोरोना काळात या स्पर्धा बंद पडल्या, त्यानंतर एकदा कसे तरी करून अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी या दोन्ही स्पर्धांचे संयोजन केले. कुस्ती व फुटबॉल सामन्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. त्यातून मल्ल तसेच फुटबॉल संघांना आर्थिक मदत होत राहिली. परंतु आता या स्पर्धाकडेही दुर्लक्ष झाले आहे.
जबाबदारी कोणाकडे..
अधिकारी दोन तीन वर्षांनी नवीन येतात, त्यांना येथील उपक्रमाची माहिती नसते. प्रत्येक वर्षी स्थानिक अधिकारी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तरतूद करून ठेवतात. मात्र ही जबाबदारी कोणी स्वीकारायची म्हणून चक्क स्पर्धाच घेण्याचे टाळले जात आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी असताना ही मंडळी आवडीने संयोजनात पुढाकार घेत होते. परंतु आता गेल्या साडेचार वर्षापासून लोकप्रतिनिधीच नसल्याने या स्पर्धांचा विसर पडला आहे.