नियतीने कॉन्स्टेबल दिग्विजयचा संसार अर्ध्यातच मोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 09:53 AM2021-02-24T09:53:59+5:302021-02-24T09:55:19+5:30
Death police Kolhapur- वडिलांनी आयुष्यभर खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरी करून कुटुंब घडविले. आता मुलगा मुंबई पोलीस दलात नोकरीला लागल्याने पांग फिटला असे त्यांना वाटले होते; परंतु कुटुंबाची बसलेली घडी नियतीला बघवली नाही. त्यांचा तरणाताठा मुलगा दिग्विजय हिंदुराव तळेकर (वय ३१) याचे मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. छातीत कळ आल्याचे निमित्त झाले आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. दिग्विजय आज, बुधवारी ड्यूटीवर हजर होणार होता; परंतु क्रूर नियतीने त्याला जणू आपल्या ड्यूटीवरच नेले.
कोल्हापूर : वडिलांनी आयुष्यभर खासगी गाडीवर चालक म्हणून नोकरी करून कुटुंब घडविले. आता मुलगा मुंबई पोलीस दलात नोकरीला लागल्याने पांग फिटला असे त्यांना वाटले होते; परंतु कुटुंबाची बसलेली घडी नियतीला बघवली नाही. त्यांचा तरणाताठा मुलगा दिग्विजय हिंदुराव तळेकर (वय ३१) याचे मंगळवारी पहाटे आकस्मिक निधन झाले. छातीत कळ आल्याचे निमित्त झाले आणि त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. दिग्विजय आज, बुधवारी ड्यूटीवर हजर होणार होता; परंतु क्रूर नियतीने त्याला जणू आपल्या ड्यूटीवरच नेले.
एका क्षणात होत्याचे नव्हते होते म्हणजे काय होते याचाच अनुभव भुयेवाडी (ता. करवीर) येथील तळेकर कुटुंबीय घेत आहेत. दिग्विजयच्या मृत्यूने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. अनेकांचा त्याच्या मृत्यूवर विश्वासच बसला नाही. तळेकर हे अत्यंत सामान्य कुटुंब. शेती जेमतेमच. वडिलांनी चालक म्हणून नोकरी करून त्याला शिक्षण दिले. दिग्विजय एकुलता मुलगा. तो उत्तम गाणी म्हणायचा. माझे माहेर पंढरी. आहे भिवरेच्या तीरीह्ण हा त्याचा अत्यंत आवडीचा अभंग. तो हा अभंग गाऊ लागला की लोकही तल्लीन होऊन जात.
पोलीस खात्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्याचे गाणे हमखास असायचे. प्रकृतीनेही चांगला. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी तो मुंबई पोलीस दलात भरती झाला. त्यानंतर गेल्या ७ जूनला लग्न झाले. त्याची पत्नी सध्या गर्भवती आहे. त्यामुळे घरात कमालीचे आनंदाचे वातावरण होते. दोनच दिवसांपूर्वी तो सुट्टीवर आला होता आणि पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने तो जागा झाला. घशात खवखवही होत होती. त्यानंतर उलटी झाल्याने थोडे बरे वाटले; परंतु तोपर्यंतच तो खाली कोसळला. तातडीने त्याला सीपीआरला हलविले; परंतु सगळेच संपले होते. त्याच्या निधनानिमित्त गावाने व्यवहार बंद ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली.
कोरोना लस घेतल्यानंतर...
तो पोलीस दलात असल्याने दहा दिवसांपूर्वी त्याने कोरोना लस घेतली होती. त्यानंतर दोन दिवस त्याला भोवळ येत होती. दंडही दुखत होता; परंतु त्यानंतर त्याने ड्यूटी केली व प्रकृतीची तक्रार नसल्याने सुट्टीवर गावी आला. शवविच्छेदनानंतर त्याचा व्हिसेरा मात्र राखून ठेवण्यात आला आहे.