गणेशोत्सवातील डॉल्बीची भिंत नष्ट करा
By admin | Published: August 25, 2016 12:34 AM2016-08-25T00:34:43+5:302016-08-25T00:39:22+5:30
विश्वास नांगरे-पाटील : कागल येथे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा; विधायक ऊर्जा सर्वत्र पोहोचवा
कागल : गणरायासमोरील ‘झिंगाट’ नाच बंद करण्यासाठी डॉल्बीच्या भिंती नष्ट करा. गणरायासमोर सूर, मंजूळ स्वर निनादू देत. कागलमध्ये समरजितसिंह घाटगे यांनी लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कागलमधील ही सकारात्मक विधायक ऊर्जा सर्वत्र पोहोचली पाहिजे, असे मत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.
येथील बहुउद्देशीय सभागृहात शाहू ग्रुपच्या वतीने कागल तालुक्यातील ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सव २0१६’ यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मेळाव्याचे संयोजक शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पोवार, ‘तरुण भारत’चे निवासी संपादक जयसिंग पाटील, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, तहसीलदार किशोर घाडगे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, बदमाश लोकांसाठी आमची भाषा वेगळी असते; पण नागरिकशास्त्र लोकांना दंडुका हातात घेऊन सांगायचा का? देशाच्या सीमांचे संरक्षण करणाऱ्यांना आमच्यातील दंगली शमविण्यासाठी बोलवायचे का? अत्यंत सात्विकपणे साजरा करायचा हा गणेशोत्सव असताना पोलिसांसाठी तो वार्षिक परीक्षेसारखा का झाला आहे? कदाचित सध्या या उत्सवाकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन
चुकत असावा. १२३ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य चळवळीला पाठबळ मिळण्यासाठी हा उत्सव सुरू केला. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे झाली. टिळकांना अभिप्रेत असा हा उत्सव होतो का? हा प्रश्न आहे. डॉल्बीच्या भिंती उभ्या करून व्यसनाधीनतेने नाच करणे हा उत्सव आहे काय? उच्चभ्रूमधील रेव्ह पार्ट्या आणि डॉल्बीचा हा नाच एकसारखाच आहे. त्यामुळे गणरायासमोर सूर, मंजूळ स्वर निनादू देत.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, डॉल्बी लावला की कार्यकर्ते नाचतात. नाचण्यासाठी मग चार्ज व्हावे लागते. तेथूनच व्यसनाधीनतेचा विळखा पडतो. समाजात दुरावा निर्माण होतो. डॉल्बीमुक्त उत्सवाबरोबर व्यसनमुक्ती आणि महिलांच्या सहभागाबद्दल आम्ही प्रयत्न करीत आहोत. ते पुढे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी २४ जुलै १९१७ रोजी सर्वांना सक्तीचे शिक्षण देण्याचा पाया घातला त्याची सुरुवात गणेशोत्सवापासूनच केली होती. त्यासाठी एक लाख रुपयाची तरतूदही केली होती. तीच प्रेरणा घेऊन समाजासाठी सर्वांनी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करूया. डॉल्बी लावून नाचणे म्हणजे गणेशोत्सव नव्हे.
यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, प्रदीप देशपांडे, श्रीराम पवार, जयसिंग पाटील यांचीही भाषणे झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव यांनी प्रास्ताविक केले. पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी आभार मानले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन
केले. (प्रतिनिधी)
भाषण ऐकण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी
‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सव २0१६’ या मेळाव्याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बहुउद्देशीय सभागृह पूर्ण भरले होते. विश्वास नांगरे-पाटील यांचे भाषण ऐकण्याचीही उत्सुकता होती. यामुळे सभागृहाबाहेरही तरुण मंडळांचे कार्यकर्ते, युवक, युवती, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती. विश्वास नांगरे-पाटील यांनी कार्यक्रमानंतर सभागृहाबाहेरील युवक, युवतींशी संवाद साधला. सभागृहाबाहेर मंडप उभारून स्क्रीन लावण्यात आली होती.
यांचा झाला सत्कार
मेळाव्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या हौसाबाई सोनुले, अर्चना भोपळे, सुवर्णा हसुरे, रंजना शेट्टे तसेच नालंदा वाचनालयाला उत्सवाची देणगी खर्च करणाऱ्या कसबा सांगाव येथील रोहिदास कांबळे यांचा आणि व्यासपीठावरील सर्वांचा सत्कार करण्यात आला. तसेच कागल पोलिस ठाण्याच्या गणराया अवॉर्डचेही यावेळी वितरण करण्यात आले.
समाजातील गिधाडे शोधायला हवीत
या मेळाव्याचे आकर्षण असणाऱ्या विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणाने सभागृहास मंत्रमुग्ध केले. माणसाचे मांस खाण्यासाठी टपलेली समाजातील गिधाडे शोधायला हवीत, असे सांगत शेरोशायरी, काव्य, संस्कृत श्लोक, धार्मिक वचने, कविता, उदाहरणे सादर करीत सर्वांची मने जिंकली.