डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करा, शौमिका महाडिक, सर्जेराव पाटील पेरीडकर यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:43 AM2019-06-04T10:43:21+5:302019-06-04T10:44:27+5:30
राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी केले. गावातील गटारी तुंबल्याप्रकरणी यापुढे ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
कोल्हापूर : राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, नागरिकांनी डासांची उत्पत्तिस्थाने नष्ट करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर यांनी केले. गावातील गटारी तुंबल्याप्रकरणी यापुढे ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये हे आवाहन करतानाच ३० जूनपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची यावेळी माहिती देण्यात आली.
कोल्हापूर विभागाचे सहायक संचालक डॉ. सी. जे. शिंदे म्हणाले, नागरिकांनी या कालावधीमध्ये पाण्याची साठवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोल्हापूरमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या स्थलांतरितांमुळे हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ एस. एस. अनुसे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. व्ही. एल. मोरे, जिल्हा परिषदेचे पक्षप्रतोद विजय भोजे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगश साळे यावेळी उपस्थित होते.