कोरोचीत बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

By admin | Published: December 28, 2015 12:20 AM2015-12-28T00:20:24+5:302015-12-28T00:22:51+5:30

उत्पादन शुल्कची कारवाई : कणेरी, कसबा बावड्यातही छापे; ५० लाखांचा मद्यसाठा जप्त; सहाजणांना अटक

Destroyed the fake pharmaceutical factory | कोरोचीत बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

कोरोचीत बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त

Next

कोल्हापूर/ इचलकरंजी / तारदाळ : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तीन ठिकाणी दारूअड्ड्यांवर उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी रात्री छापे टाकून सहा आरोपींना अटक केली. कोरोची येथील बेकायदेशीर मद्यनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त करून दोन चारचाकी वाहनांसह ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू अड्डाचालकाचे धाबे दणाणले आहेत. मुख्य मालक संजय धोंडिराम माने (३०, रा. कोरोची, ता. हातकणंगले), जगदीश आप्पासो केसरकर (वय ४०, रा. नांगनूर, ता. चिकोडी), श्रीनिवास मुन्नीस्वामी आप्पा (४२, रा. रामोहाली, किंगेरी हुबळी), नागराज नारायण आप्पा (५१, रा. विवेकानंद कॉलनी, कनकपुरा, बंगलोर), टी. राजगोपाल (४०, रा. तमिळनाडू), मारुती भैरूमाने (४०, रा. गायकवाडी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.कोरोची (ता. हातकणंगले) येथे बनावट देशी-विदेशी दारूची निर्मिती या कारखान्यामध्ये राजरोसपणे केली जात असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकास मिळाली होती. त्यानुसार शनिवारी रात्री या कारखान्यावर छापा टाकून चौघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी वाहनांसह ३७ लाख किमतीचे स्पिरीट, बॉटलिंग मशीन, रिकाम्या बाटल्या, कॅरेमल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांतील लेबले, बुचे व विविध ब्रँडच्या मद्याचे बॉक्स व दारूचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश कावळे, उपअधीक्षक संजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
अवैध गुटखा निर्मिती कारखान्यापाठोपाठ दारूचा कारखाना सापडल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे येथील उत्पादन शुल्क विभाग व पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी तपासणी सुरू आहे. दरम्यान, कणेरीवाडी (ता. करवीर) येथे इंडिका मांझा या गाडीतून मद्याचे बॉक्स घेऊन जात असताना संजय धोंडिराम माने याला पथकाने अटक केली.
त्यावेळी गाडीत बॅगपायपर व्हिस्कीच्या १० बॉक्ससह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक चौकशी केली असता कोरोची येथे बारमध्येच ही बनावट दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक राजाराम खोत यांच्या पथकाने कोरोची येथील माने याच्या कारखान्यावर छापा टाकला.
त्यावेळी माने खानावळीच्या पिछाडीस असलेल्या शेडमध्ये बनावट दारू तयार करीत असल्याचे आढळले. त्यावेळी तेथील पाचजणांना पथकाने पकडले.
या कारवाईत दारू निर्मितीसाठी लागणारे स्पिरीट, बॉटलिंंग मशीन, रिकाम्या बाटल्या, कॅरेमल, विविध ब्रँडच्या कंपन्यांची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यांतील लेबले व बुचे तसेच ब्लेंडर स्प्राईट, ओल्ड ट्रॅव्हल व्हिस्की, हायवर्डस बॅगपायपर व्हिस्की असे ७५० व १८० मिलीच्या तयार मद्याचे ३४६ बॉक्स यासह अन्य साहित्यही जप्त केले.
ही बनावट दारू विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या मारुती भैरूमाने याला कसबा बावडा येथे अटक केली. त्याच्याकडूनही मद्याचे १० बॉक्स व इंडिका गाडी ताब्यात घेतली. या कारवाईत एकूण सहाजणांना अटक केली असून, ४१ लाख ४४ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



मोठे रॅकेट : बनावट मद्यनिर्मितीची यंत्रणा
काही दिवसांपूर्वीच जगदीश, श्रीनिवास व नागराज यांनी बंगलोर येथून बनावट मद्यनिर्मितीची मशिनरी आणली होती.
हे तिघेजण मिळूनच बनावट मद्य तयार करीत होते, तर या मद्याची महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशात विक्री केली जात होती. त्यासाठी मोठे रॅकेटही उभे केले असल्याचे समजते.
शहरालगतच बनावट मद्याचा कारखाना सुरू असल्याची साधी कुणकुणही येथील उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक पोलिसांना कशी लागली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Destroyed the fake pharmaceutical factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.