वाळूचे १२ खड्डे उद्ध्वस्त
By admin | Published: March 17, 2015 10:47 PM2015-03-17T22:47:32+5:302015-03-18T00:07:19+5:30
गौरवाडमध्ये घटना : बेकायदेशीर वाळू प्रकरणी महसूल विभाग आक्रमक
कुरुंदवाड : गौरवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदी पात्रातील बेकायदेशीर वाळू चोरण्यासाठी मारलेल्या वाळू खड्ड्यांवर शिरोळ महसूल विभागाने कारवाई केली. या कारवाईत बारा वाळू खड्डे जेसीबीच्या साहाय्याने बुजविल्याने वाळू तस्करांत खळबळ उडाली आहे. दरम्यान, नदी पलीकडील सात गावांमध्ये अद्यापही अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा होत असताना, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महसूल विभागाच्या कारवाईबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. गौरवाड येथील गट नं. १३८ लगत असलेल्या कृष्णा नदी पात्रात प्रत्येक वर्षी बेकायदेशीर वाळू उपसा केली जाते. नदी पात्रात खड्डे मारून रात्री बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा करण्यासाठी वाळू तस्करांची हालचाल असते. त्यासाठी या ठिकाणी बारा वाळू खड्डे मारल्याचे काही सुज्ञ नागरिकांनी महसूल विभागाला कळविले होते. तसेच राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीचे तालुकाध्यक्ष कृष्णा लोकरे यांनी येथील बेकायदेशीर वाळू उपसा बंद व्हावा, असे लेखी निवेदन तहसीलदार सचिन गिरी यांना दिले होते. त्यानुसार नृसिंहवाडी मंडल अधिकारी ए. डी. पुजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने बाराही खड्डे उद्ध्वस्त करून टाकले. त्यामुळे वाळू उपशाआधीच कारवाई झाल्याने वाळू तस्करांत खळबळ उडाली आहे. या कारवाईत नृसिंहवाडी तलाठी एस. एस. खोत, औरवाड तलाठी रविकांत कांबळे, गणेशवाडी तलाठी आर. एस. जाधव, आदी सहभागी झाले होते. (वार्ताहर)