आसुर्लेतील तलाठ्यास लाच घेताना अटक
By admin | Published: April 15, 2015 11:52 PM2015-04-15T23:52:33+5:302015-04-15T23:59:07+5:30
दोनशेंची लाच : घराची पोलिसांकडून झडती
कोल्हापूर/पोर्ले तर्फ ठाणे : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील खरेदी केलेल्या जमिनीस नाव लावण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेताना तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. हनुमंत शंकर बदडे (वय ४६, रा. वसंत ऋतु कॉलनी, कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. लाचलुचपत विभागाची एका महिन्यात ही तिसरी कारवाई आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, महेश भिवा जाधव (रा. आसुर्ले, ता. पन्हाळा) यांनी दि. ३ फेब्रुवारी २०१५ला गावातील गट नं. ३४ मधील क्षेत्र ०.०९.१ आर. इतकी जमीन आपल्या व पत्नीच्या नावावर खरेदी केली आहे. जमिनीस दोघांची नावे लावण्यासाठी जाधव यांनी त्याच दिवशी तलाठी बदडे यांची गावचावडीत भेट घेऊन अर्ज दिला. त्यावेळी बदडे याने त्यांच्याकडे दोनशे रुपयांची मागणी केली. त्यानंतर जाधव यांनी पैसे नंतर देतो, असे म्हणून ते तेथून निघून आले. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांची भेट घेऊन बदडे याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार आफळे यांनी दोन शासकीय पंच पाठवून लाचेच्या मागणीची खात्री करून घेतली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आसुर्ले गावचावडीच्या आजूबाजूला सापळा लावला. जाधव हे गावचावडीमध्ये गेले. यावेळी दबडे हा कार्यालयातून बाहेर आला. त्याने त्यांच्याकडून दोनशे रुपये घेतले. यावेळी काही क्षणांतच आजूबाजूला सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी दबडेवर झडप टाकली. अचानक झालेल्या कारवाईने तो भांबावून गेला. सुरुवातीस तो मी लाच घेतली नाही, असा अविर्भाव करू लागला. त्यानंतर पोलिसांनी त्याला नोटांचे नंबर, जाधव व त्याच्यामध्ये झालेले संभाषण दाखविताच तो शांत झाला. ही कारवाई करून पोलीस जीपमधून घेऊन जाताना अश्रू अनावर झाले. बदडे याच्या कसबा बावडा येथील घराची रात्री उशिरा पोलिसांनी झडती घेतली. त्याला करवीर पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. याप्रकरणी पन्हाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक आफळे यांच्यासह पद्मा कदम, हवालदार श्रीधर सावंत, अमर भोसले, जितेंद्र शिंदे, सर्जेराव पाटील आदींनी केली. (प्रतिनिधी)