सीमाभागातील विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक
By admin | Published: June 19, 2015 11:30 PM2015-06-19T23:30:44+5:302015-06-20T00:36:46+5:30
ई. बी. सी. सवलत : महाराष्ट्रात बारावीपर्यंत मोफत शिक्षण असले तरी त्याचा फायदा नाही
प्रकाश चोथे - गडहिंग्लज -सीमाप्रश्न..! कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागावरच्या सुमारे साडेआठशे खेड्यांतील जवळपास ४० लाख मराठी बांधवांच्या जीवन-मरणाचा प्रश्न..! भाषावार प्रांतरचनेत कर्नाटकात समावेश होऊनही कर्नाटकी दडपशाहीला न जुमानता केवळ मराठी प्रेमापोटी ‘मराठी अस्मिता’ जपण्याचा प्रयत्न आता दुसऱ्या पिढीकडून होत आहे; पण त्यासाठी कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन मराठी शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन ‘ई.बी.सी. सवलत’ही देऊन पाठबळ देऊ शकत नाही, हे विदारक सत्य आहे.
भाषावार प्रांतरचनेत बेळगाव, निपाणी, कारवार, बिदरसह सुमारे ८६५ खेड्यांचा समावेश कर्नाटकात झाला; पण तेथील बहुसंख्य जनता मराठी भाषिक असल्याने त्यांचा समावेश महाराष्ट्रात व्हावा यासाठी लोकशाही मार्गाने त्यांचा अखंड लढा सुरू आहे. मराठी जनतेने जोपासलेली मराठी संस्कृती नष्ट करण्याचा कर्नाटक सरकारने चंगच बांधला असला, तरी सनदशीर मार्गाने लढून मराठी बांधव त्याचा मुकाबला करीत आहेत.
त्यासाठीच सीमाभागातील बहुसंख्य मुले प्राथमिक शिक्षणापासूनच जवळच्या महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळेची वाट धरतात. गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लजसह महागाव, नेसरी, हिडदुगी, हेब्बाळ-जलद्याळ तसेच चंदगड तालुक्यातील कोवाड येथील शाळा- कॉलेजमधील बहुसंख्य मुले ही कर्नाटकातील असतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने बारावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली आहे.
ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १५,००० रुपयांपेक्षा जास्त नाही, अशा विद्यार्थ्यांना ई.बी.सी. सवलत अंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अनुदानित शाळेत सरसकट फी माफी करते; पण केवळ मराठी प्रेमापोटी कर्नाटकातून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर मात्र हा अन्याय होतो. त्यांना दरमहाची शिक्षण फी, वर्षातून दोनदा असणारी सत्र फी आणि एकदा प्रवेश फी अशी फीची रक्कम भरावी लागते.
मराठी प्रेमापोटी कर्नाटकात राहून मराठी शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही ई.बी.सी. सवलत मिळावी ही मागणी सीमाभागातील शिक्षणक्षेत्रातून आता जोर धरू लागली आहे. या सवलतीमुळे सरकारी तिजोरीवर खूप मोठा आर्थिक बोजा पडेल अथवा सीमावासीय मराठी बांधवांना खूप मोठा आर्थिक हातभार लागेल असेही नाही; पण कर्नाटकी दडपशाहीला न जुमानता मराठी अस्मिता जोपासणाऱ्या त्यांच्या प्रयत्नाला निश्चितच बळ मिळेल. त्याासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक पाऊल सीमाप्रश्नाच्या दिशेने उचलणार का..? हा प्रश्न आहे.
येथे येतात कर्नाटकातून मुले...
राजा शिवछत्रपती व महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय महागाव, छत्रपती शिवाजी कनिष्ठ व टी. के. कोलेकर वरिष्ठ महाविद्यालय नेसरी, हिडदुगी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय हिडदुगी, भावेश्वरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हेब्बाळ-जलद्याळ, श्रीराम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज कोवाड तसेच गडहिंग्लजमधील शिवराज, जागृती तसेच अन्य विद्यालये व महाविद्यालयात कर्नाटकातील मुले शिक्षणासाठी येतात.
कर्नाटकातील या गावातून येतात मुले...
दड्डी, मोंदगे, खवणेवाडी, बेळंकी, कोट, अत्याळ, सलामवाडी, शिट्याहळी, धोणगट्टे, आदी गावांतील मुले हिडदुगी, नेसरी, महागाव, कोवाड येथे, तर मत्तिवडे, भैरापूर, बुगटे आलूर, शेक्कीन होसूर, हडलगे, राशिंग, हरगापूर, बाड, करजगा, संकेश्वर, आदी गावांतील मुले गडहिंग्लज येथील विविध शाळा तसेच महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात.