जिल्ह्यातील तपास यंत्रणा सुस्तावली

By admin | Published: April 29, 2015 11:43 PM2015-04-29T23:43:45+5:302015-04-30T00:23:02+5:30

वरिष्ठांचे दुर्लक्ष : गुन्हेगारीत वाढ, तपास अपूर्णच

Detective system in the district | जिल्ह्यातील तपास यंत्रणा सुस्तावली

जिल्ह्यातील तपास यंत्रणा सुस्तावली

Next

एकनाथ पाटील - कोल्हापूर  शहरासह करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज आणि इचलकरंजी, आदी विभागांतील पोलीस उपअधीक्षक हे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असल्यासारखेच आहेत. त्यांची विभागातील पोलीस ठाण्यांवर वचक नसल्याने अधिकारी व कर्मचारी सुस्तावले आहेत. जिल्ह्यात खून, खुनाच्या प्रयत्नांसह दरोडा, घरफोड्या, चेन स्नॅचिंगसारख्या घटनांनी पुन्हा तोंड वर काढल्याने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडल्याचे चित्र आहे.
वर्चस्ववादातून खून, खुनाचा प्रयत्न, तर पैशांच्या हव्यासापोटी शाळकरी मुलांचे दिवसाढवळ्या अपहरण, खंडणी, चेन स्नॅचिंग अशा गंभीर घटनांबरोबरच शहरासह इचलकरंजी, जयसिंगपूर, आदी शहरांमध्ये गँगवॉरच्या गुन्हेगारीनेही पोखरले आहे. बलात्काराच्या आणि छेडछाडीच्या घटनांनी तर कळस गाठल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. बालगुन्हेगारांची समस्याही भयावह रीतीने डोके वर काढताना दिसत आहे.
दुचाकीवरून भरधाव येऊन महिलेच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू हिसकावून ‘धूम स्टाईल’ने पलायन करण्याऱ्या चेन स्नॅचरना पकडण्याच्या नादात पोलीसच ‘घामाघूम’ झाले आहेत. विवाहबाह्य संबंध, आर्थिक किंवा मालमत्तेचा वाद, पूर्ववैमनस्य, हुंडाबळी, सावकारी, क्षणिक वादातून खुनाचे प्रमाण वाढत आहे. तरुणींना लग्नाचे, तर अल्पवयीन मुलींना खाऊचे आमिष दाखवून बलात्काराचे गुन्हे घडल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा हे या तपासामध्ये व्यस्त असल्याने त्यांना जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांकडे लक्ष देता आलेले नाही. कोल्हापूर शहर, करवीर, शाहूवाडी, गडहिंग्लज, इचलकरंजी, आदी विभागांतील पोलीस उपअधीक्षकांवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, परंतु ते मनापासून ही
जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठांचा वचक नसल्याने पोलीस स्थानक स्तरावरील
अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे सुस्तावल्याने कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.


लँडमाफियांचे
वाढते नेटवर्क
शहरालगतच्या ग्रामीण भागांत प्रचंड प्रमाणात बांधकामे उभी राहत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करून बांधकाम व्यावसायिक आणि लँडमाफिया सामान्य लोकांच्या जागा गिळंकृत करीत आहेत. या माफियांच्या जोरावर गुन्हेगारांनी आपले जाळे पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईपासून पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बेळगाव, आदी परिसरातील गुन्हेगारांच्या टोळ्यांचे कोल्हापुरातील लँडमाफियांशी कनेक्शन असल्याचे समजते.
सहा हत्यांचा तपास ?
कणेरीवाडी येथील तलावात पोत्यात सापडलेला तरुणाचा मृतदेह त्यापाठोपाठ कात्यायनी परिसरात तरुणीचा निर्घृण खून, वाशी (ता. करवीर) येथील ‘सुतारकी’ नावाच्या उसाच्या शेतात अज्ञात पाच वर्षांच्या बालिकेचा मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचे करवीर पोलिसांना आढळून आले. वाघबीळ घाटातील झुडुपात छिन्नविछिन्न अवस्थेत तरुणाचा मृतदेह करवीर पोलिसांनाच सापडला. जोतिबा-कुशिरेच्या शेतमाळावर आठ वर्षांच्या मुलीचा खून करून मृतदेह दफन केल्याचा आढळला. तो तरुण-तरुणी त्या दोन निष्पाप बालिका कोण ? त्यांचा खून कोणी केला ? हे सर्व प्रश्न आजही तसेच आहेत. शिवाजी पेठेतील हृषिकेश अनिल कोगेकर याचा कसबा वाळवेनजीक निर्घृण खून करण्यात आला. त्याचा शोध आजही लागलेला नाही.

Web Title: Detective system in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.