खोळंबा अन् प्रवाशांचे हाल
By admin | Published: December 19, 2015 01:06 AM2015-12-19T01:06:35+5:302015-12-19T01:15:43+5:30
एस. टी. कर्मचारी आंदोलन : पोलिसांबरोबर शाब्दिक चकमक; दुपारनंतर आंदोलन मागे
कोल्हापूर : राज्यातील महाराष्ट्र एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स, काँग्रेस (इंटक)च्या कामगारांचे गुरुवारपासून सुरु असलेले आंदोलन शासनाशी सकारात्मक चर्चा झाल्याने शुक्रवारी दुपारनंतर मागे घेण्यात आले. मात्र दुपारपर्यंत जिल्ह्यातील बससेवा विस्कळीत झाली. सकाळी सव्वाबाराच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलकांनी बस रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची धमकी देताच आंदोलक नरमले. ‘गांधीगिरी’ पद्धतीने चालकांना गुलाबपुष्प देऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
अन्य महामंडळे व राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा ‘एस.टी’मध्ये अत्यंत कमी पगार आहे. कामगार करार २०१२-१६ रद्द करून एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सभासद गुरुवारी (दि. १७) मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व आगारांतील चालक, वाहक, तांत्रिक या विभागांतील ७०० कर्मचारी काम बंद करून संपात सहभागी झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आठपासून पुन्हा ‘इंटक’चे राज्याचे उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, विभागीय सचिव आप्पासाहेब साळुंखे, विजय सणगर, रूपाली पाटील, सारिका पाटील, सुरेश गवळी, बजरंग चव्हाण, सुनंदा काळे, सारिका शिंदे, सयाजी घोरपडे, सुनंदा माने यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मारला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. साडेअकरा ते साडेबारा या वेळेत आंदोलकांनी काही बसेस अडविण्याचा प्रयत्न केला. त्वरित पोलिसांचा फौजफाटा आला. त्यांनी आंदोलकांना बाजूला करून बससेवा सुरळीत केली. आंदोलक आक्रमकपणे बस रोखण्यासाठी जात होते. त्यावेळी ‘काल ताब्यात घेऊन सोडून दिले होते, आज गुन्हा दाखल करतो,’ असा दम शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद चौधरी यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी काही काळ पोलीस अधिकारी आणि आंदोलक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी आंदोलकांनी नरमाईची भूमिका घेत शांततेने संप सुरू ठेवला.
दरम्यान, बसवाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सर्वच फलाटांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. बससंबंधी विचारणा करण्यासाठी चौकशी कक्षात झुंंबड उडाली होती. प्रवाशांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत असल्याने एस.टी. प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. नाइलाजास्तव काही प्रवाशांनी खासगी वाहनांतून जाणे पसंत केले.