हिंदूऐवजी लिंगायत धर्म नोंद करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 11:01 AM2021-02-02T11:01:44+5:302021-02-02T11:04:04+5:30
Lingayat Kolhapur- लिंगायत धर्माचा दर्जा मिळविण्यासाठी आता नव्याने रणशिंग फुंकण्याचा निर्धार सोमवारी येथे करण्यात आला. जनगणनेवेळी हिंदूऐवजी केवळ लिंगायत धर्म अशीच नोंद करण्याचा निर्णयही यावेळी झाला.
कोल्हापूर : लिंगायत धर्माचा दर्जा मिळविण्यासाठी आता नव्याने रणशिंग फुंकण्याचा निर्धार सोमवारी येथे करण्यात आला. जनगणनेवेळी हिंदूऐवजी केवळ लिंगायत धर्म अशीच नोंद करण्याचा निर्णयही यावेळी झाला.
शुक्रवारी (दि. ५) जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरविली जाणार आहे. यावेळी दिशाभूल करणाऱ्यांचा समाचार घेतला जाणार आहे. जनगणना २०२१ लिंगायत समाजाची भूमिका या विषयासंदर्भात दसरा चौकातील चित्रदुर्ग मठात कोल्हापूर लिंगायत समाज संस्था आणि बसव केंद्र कोल्हापूरच्यावतीने ही बैठक झाली. यावेळी जागतिक लिंगायत महासभेचे शंकर गुडस, शरण परूशेट्टी, राजाभाऊ शिरगुप्पे, सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, बाबूराव तारळी प्रमुख उपस्थित होते.
शंकर गुडस म्हणाले, समाजातील मुलांना ९५ टक्के गुण मिळवूनही पुढील वर्षात प्रवेश मिळत नाही, हे वास्तव आहे. समाजाच्या अडचणीमध्ये भरच पडत आहे. यामुळे लिंगायत धर्मासाठीचे आंदोलन तीव्र करावे लागणार आहे. आता नाही तर कधीच नाही, अशी स्थिती आहे. कोल्हापुरातील समाजाने जागातिक लिंगायत महासंघाच्या माध्यमातून नव्या जोमाने लढा सुरू केल्यास दहा हत्तींचे बळ मिळेल.
शरण परुशेट्टी यांनी प्रत्येक गावातील लोकांमध्ये लिंगायत धर्माच्या मागणीसंदर्भात जनजागृती करावी, एकजुटीने लढा दिल्यास नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. बी. एम. पाटील यांनी, लिंगायत धर्माचा दर्जा का मिळावा, याची माहिती दिली.
राजा शिरगुप्पे म्हणाले, ८०० वर्षांपूर्वी बसवाण्णा यांनी माणसांमध्ये माणूसपण रुजवले. गेल्या काही वर्षांमध्ये मात्र, अमूलाग्र बदल झाले असून मूठभर लोक स्वार्थ साधत आहेत. त्यामुळे पुन्हा बसवाण्णांचे विचार समाजात रुजवण्याची वेळ आली आहे. यावेळी राजशेखर तंबाके, बाबूराव तारळी, मिलिंद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
सरलाताई पाटील म्हणाल्या, काही शक्ती लिंगायत धर्माच्या आंदोलनात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा लागेल. शनिवारी सकाळी १० वाजता याच ठिकाणी जिल्ह्यातील प्रमुख सदस्यांचा मेळावा आणि जागतिक लिंगायत महासंघाच्या शाखेची स्थापना केली जाईल. आंदोलनाचे नव्याने रणशिंग फुंकले जाईल.