Kolhapur: शक्तिपीठ महामार्गाचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार, रद्द केल्याचे लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 12:42 PM2024-08-13T12:42:33+5:302024-08-13T12:43:24+5:30
कोल्हापूर : शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने सोमवारी ...
कोल्हापूर : शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तिपीठ महामार्ग करण्याचा सरकारचा डाव हाणून पाडण्याचा निर्धार शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने सोमवारी केला. राज्य सरकार शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचे लेखी पत्र काढत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची घोषणाही खासदार शाहू छत्रपती यांच्या उपस्थितीत सोमवारी करण्यात आली.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी नुकतीच संघर्ष समितीची स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या वतीने रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. यावेळी पवार यांनी हा महामार्ग थांबवण्यात आल्याचे सांगितले. तसे लेखी पत्र देण्याची मागणी समितीने केली होती. ते न मिळाल्याने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सकाळी १० नंतर जिल्हाधिकारी कार्यायलयासमोर शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान खासदार शाहू छत्रपती यांनीही आदोलनाच्या ठिकाणी पाठिंबा दिला. हा महामार्ग रद्द केल्याचे पत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. आमदार ऋुतुराज पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनीही आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. जिल्हाधिकाऱ्यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी मच्छिंद्र मुगडे, शिवाजी मगदुम, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, सचिन साळोखे, विजय पोवार, डॉ. मधुकर बाचूळकर, माणिक मंडलिक, वसंतराव मुळीक, प्राचार्य महादेव नरके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.