पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर देवदासींचा धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 06:35 PM2019-03-01T18:35:47+5:302019-03-01T18:37:00+5:30
गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवदासींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशाराही देवदासींनी यावेळी दिला.
कोल्हापूर : गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवदासींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशाराही देवदासींनी यावेळी दिला.
दुपारी एकच्या सुमारास सदर बाजार येथून माजी नगरसेवक अशोक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. देवदासी, वाघ्या मुरळी यांनी हातात सुती चवंडके, हालगी, ढोल, दिमडी, ढोलक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात व रेणुका-यल्लमांच्या नावाचा जागर करत मोर्चा काढला.‘देवदासींचा पेन्शन प्रस्ताव त्वरीत मंजूर करा’, ‘देवदासींनी विविध शासकीय योजनांचा लाभ द्या’ असे फलक लक्ष वेधत होते.
मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बी. बी. यादव यांना सादर करण्यात आले. गेल्या दोन वर्षांमध्ये देवदासींच्या मागण्या मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या प्रमुखांसोबत तीनवेळा बैठक घेतली; परंतु त्यातून आश्वासनांशिवाय काहीच निष्पन्न झाले नसल्याचे सांगण्यात आले.
आंदोलनात माजी नगरसेविका मायादेवी भंडारे, देवताई साळोखे, रेखा वडर, द्रौपदी सातपुते, नसीम देवडी,यल्लवा कांबळे, शांताबाई पाटील, शारदा अवघडे, लक्ष्मी साठे, छाया चित्रुक, पंकज भंडारे, रेणुका वाघमारे, पिराजी कांबळे आदींसह महिला सहभागी झाल्या.