देवानंद शिंदेंकडे तिसऱ्यांदा अतिरिक्त कार्यभार; पुणे, मुंबईपाठोपाठ ‘मराठवाडा’ची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:46 AM2019-06-04T00:46:47+5:302019-06-04T00:46:52+5:30

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्तप्रभारी कार्यभार ...

Devanand Shinde gets additional charge for the third time; Responsible for 'Marathwada' after Pune, Mumbai | देवानंद शिंदेंकडे तिसऱ्यांदा अतिरिक्त कार्यभार; पुणे, मुंबईपाठोपाठ ‘मराठवाडा’ची जबाबदारी

देवानंद शिंदेंकडे तिसऱ्यांदा अतिरिक्त कार्यभार; पुणे, मुंबईपाठोपाठ ‘मराठवाडा’ची जबाबदारी

Next

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्तप्रभारी कार्यभार सोपविला आहे. त्याबाबतचा आदेश कुलपती कार्यालयाकडून सोमवारी सकाळी त्यांना मिळाला. यापूर्वी डॉ. शिंदे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून काम सांभाळले आहे.
डॉ. शिंदे यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दि. १६ जून २०१५ रोजी निवड झाली. त्यानंतर पहिल्यांदा दि. १५ मे २०१७ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरुपदाचा अतिरिक्त आला होता. त्यानंतर आॅगस्टमध्ये त्यांच्याकडे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला. आता तिसऱ्यांदा त्यांच्याकडे मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त प्रभारी कार्यभार सोपविला. या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने डॉ. शिंदे यांच्याकडे प्रभारी कार्यभार असेल.

समतोल साधण्याची कसरत
उत्तरपत्रिका तपासणीचा मुद्दा तापल्याने त्यावेळी मुंबई विद्यापीठातील कामकाजामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांचा अधिकतर वेळ व्यतीत होऊ लागला. कार्यक्रम, बैठकीपुरतेच शिवाजी विद्यापीठात त्यांचे येणे झाले. त्याचा परिणाम विद्यापीठातील प्रशासकीय कामावर झाला. प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत विद्यापीठाकडून होणाºया कार्यवाहीची गती मंदावली होती, असा आरोप कोल्हापूरमधील विविध संघटनांनी केला होता; त्यामुळे त्यांच्याकडील अतिरिक्त कार्यभाराबाबत नाराजी व्यक्त झाली होती. डॉ. शिंदे यांच्या कुलगुरुपदाचा चार वर्षांचा कालावधी पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. सप्टेंबरमध्ये शिवाजी विद्यापीठ हे ‘नॅक’ मूल्यांकनाला सामोरे जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. शिंदे यांना मूळ आणि अतिरिक्त कार्यभार समतोलपणे सांभाळावा लागेल.

Web Title: Devanand Shinde gets additional charge for the third time; Responsible for 'Marathwada' after Pune, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.