देवस्थानने दिली सामाजिक संस्थांना साखर
By admin | Published: June 18, 2015 12:00 AM2015-06-18T00:00:58+5:302015-06-18T00:36:29+5:30
‘लोकमत’च्या छायावृत्ताची दखल : गेले कित्येक दिवस पाचशे किलो साखर वापराविना--लोकमतचा प्रभाव
कोल्हापूर : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरातील खासगी सुरक्षारक्षकांच्या केबीनमध्ये ठेवण्यात आलेली ५०० किलो साखर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने बालकल्याण संकुल व पाचगावमधील छत्रपती शाहू शैक्षणिक आश्रम या दोन संस्थांना दिली. वापराविना गेले कित्येक दिवस या साखरेची पोती पडून असल्याचे छायाचित्र बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची तातडीने दखल घेत देवस्थानने हे पाऊल उचलले. भक्तांमध्येही या वृत्ताची चर्चा दिवसभर सुरू होती.
अंबाबाईच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक येत असतात. या भाविकांना देण्यात येणारा लाडू प्रसाद देवस्थान समितीच्यावतीने तयार केला जातो. त्यामुळे भक्त आणि विविध साखर कारखान्यांकडून समितीला पोत्यांनी साखर येते. मात्र, तीन वर्षांपूर्वी समितीने लाडू प्रसादाचा ठेका महिला बचत गटाला दिला. त्यात देवस्थानच्या अन्नछत्राचा लाभ घेणाऱ्या भाविकांची संख्याही कमी असल्याने साखरेचा वापर होत नाही. त्यावर पर्याय म्हणून जास्तीची साखर बालकल्याण संकुलासह शहरातील सेवाभावी संस्थांना दिली जाते.
खासगी सुरक्षारक्षकांच्या केबीनमधील साखर गेल्या चार-पाच महिन्यांतील असल्याची माहिती अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांनी दिली. तसेच एकूण ५०० किलो साखरेपैकी २५० किलो साखर बालकल्याण संकुलला व २५० किलो साखर पाचगावच्या छत्रपती शाहू शैक्षणिक आश्रमाला दिली असल्याचे सांगितले. बालकल्याण संकुलाच्या कार्यवाह पद्मजा तिवले यांनी साखर अजूनही चांगली असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)