देवस्थानने मोरेवाडीतील ३ एकर जमीन घेतली ताब्यात अंबाबाईची मालकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 03:48 PM2020-03-06T15:48:05+5:302020-03-06T15:51:03+5:30
देवस्थानच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने मोरेवाडी (ता.करवीर) येथील ३ एकर ६ गुंठे (एक हेक्टर २६ आर) जमीन आर. एल. तावडे फौंडेशनच्या किशोर तावडे यांच्याकडून समितीने गुरुवारी ताब्यात घेतली. ही जमीन करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मालकीची असून त्यावर बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या इमारतीला सील करण्यात आले.
कोल्हापूर : देवस्थानच्या अटी व शर्तींचा भंग केल्याने मोरेवाडी (ता.करवीर) येथील ३ एकर ६ गुंठे (एक हेक्टर २६ आर) जमीन आर. एल. तावडे फौंडेशनच्या किशोर तावडे यांच्याकडून समितीने गुरुवारी ताब्यात घेतली. ही जमीन करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या मालकीची असून त्यावर बेकायदेशीररीत्या बांधण्यात आलेल्या इमारतीला सील करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची मोरेवाडी येथे गट नं ५३, ५५, ५६, ५७ येथील ही जमीन आर. एल. तावडे फौंडेशनतर्फे किशोर तावडे यांना २००७-०८ मध्ये एक वर्षासाठी शेती करण्यासाठी देण्यात आली होती. मात्र तावडे यांनी गट नं ५७ मध्ये आरसीसी इमारत व गट नं ५६ मध्ये वीट बांधकाम करून पत्र्याचे शेड बांधल्याचे २०१२ साली निदर्शनास आले. तेव्हापासून समितीने जागा परत मिळावी यासाठी तहसिलदारांमार्फत वारंवार पत्रव्यवहार केला होता.
नोटिसा पाठवल्या होत्या. अखेर या जमिनीची समितीने भूमी अभिलेख कार्यालय करवीर यांच्यावतीने शासकीय मोजणी करून घेतली, असे या मिळकतीत तावडे यांनी विनापरवाना बांधकाम करून शर्तभंग केल्याचे सिद्ध झाले.
मिळकतीबाबत कायदेशीर कारवाई करण्याबाबत देवस्थान समितीने विधि सल्लागार अॅड. ए. पी. पोवार यांचा सल्ला घेतला व त्यानुसार या जमिनीचा कब्जा घेण्यासाठी महसूल विभागाशी पत्रव्यवहार केला. अखेर गुरुवारी दुपारी महसूल विभागाच्या वतीने मंडल अधिकारी स्वरूप पाटील यांनी या जागेचा पंचनामा करून इमारत सील केली व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या ताब्यात किल्ल्या व कागदपत्रे दिली. यावेळी आर. एल. फौंडेशनतर्फे स्वत: किशोर तावडे समितीचे सचिव विजय पोवार, उपसचिव शिवाजी साळवी, उपअभियंता सुयश पाटील, मिलिंद घेवारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
हातकणंगलेत सर्वाधिक अतिक्रमणे
देवस्थानच्या बहुतांशी जमिनींवर अटी व शर्तींचा भंग करून बेकायदेशीररित्या अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यात हातकणंगले तालुक्यात सर्वाधीक प्रमाण आहे. अशा सर्व कुळांना समितीने नोटिसा काढल्या आहेत. काही जमिनी पून्हा समितीच्या ताब्यात आल्या आहेत.
जमिनींची ८२ प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत. सध्या स्टार आयटी कंपनीकडून समितीच्या ताब्यातील ३०४२ मंदिरे, २३ तालुके व १६०० गावांतील जमिनींचा सर्व्हे सुरू आहे. त्यासाठी २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. या सर्व्हेनंतर समितीच्या नेमक्या किती जमिनींवर अतिक्रमण झाले आहे हे लक्षात येईल.