देवस्थानने रस्त्यांसाठी निधी द्यावा, सर्वपक्षीय कृती समितीचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:41 AM2019-11-16T11:41:26+5:302019-11-16T11:42:47+5:30
मुसळधार पाऊस आणि महापुराने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले.
कोल्हापूर : मुसळधार पाऊस आणि महापुराने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. खड्ड्यांत पडून बरेच अपघात झाले असून शहरातील नागरिक त्रस्त आहेत. कोल्हापुरात रोज पर्यटक येतात, त्यांनाही याचा त्रास होत आहे. हे रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. मात्र त्यासाठी महापालिकेकडे पुरेसा निधी नाही, त्यामुळे शासनावर अवलंबून राहावे लागत आहे. तरी देवस्थान समितीने रस्त्यांसाठी निधी द्यावा.
यावेळी महेश जाधव यांनी या विषयावर देवस्थान समितीच्या बैठकीच सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. तसेच जिल्हाधिकारी व आयुक्तांचा सल्ला घेऊन, कायदेशीर बाबींचा विचार घेऊन त्याबाबतचा ठराव करू. त्यानंतर न्याय विधि खात्याकडे प्रस्ताव पाठवू, असे आश्वासन दिले. यावेळी देवस्थानचे सचिव विजय पोवार, माजी महापौर आर. के. पोवार, अॅड. विवेक घाटगे, अॅड. महादेवराव आडगुळे, बाबा पार्टे, अॅड. प्रशांत चिटणीस, किशोर घाटगे, किसन कल्याणकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.