Kolhapur: वैष्णवीच्या मृत्यूप्रकरणी देवठाणे ग्रामस्थांत संताप, मठ ताब्यात घेण्याचा विचार
By उद्धव गोडसे | Published: April 15, 2024 04:57 PM2024-04-15T16:57:20+5:302024-04-15T16:58:44+5:30
महाराजांनी स्वत:हून हजर होण्याचे आवाहन, ग्रामस्थांकडून 'लोकमत'चे अभिनंदन
उद्धव गोडसे
कोल्हापूर : देवठाणे (ता. पन्हाळा) येथील श्री नृसिंह समर्थ ज्ञान मंदिर मठाचे प्रमुख बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज या दोघांच्या विरोधात देवठाणे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. तरुणीच्या खून प्रकरणी महाराज निर्दोष असतील तर, त्यांनी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होऊन खुलासा करावा. अन्यथा, मठ ताब्यात घेऊन महाराजांना हद्दपार करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती देवठाणे येथील ग्रामस्थांनी दिली. मठात घडलेला गैरप्रकार बाहेर काढल्याबद्दल त्यांनी 'लोकमत'चे अभिनंदन केले.
गेली २०-२२ वर्षे बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज या दोघांवर नितांत श्रद्धा ठेवून भाविकांनी त्यांना गुरू मानले. त्यांना जमीन दिली. मठाच्या इमारती बांधायला पैसे दिले. तीर्थयात्रा करण्यासाठी मागेल तेवढ्या रकमा दिल्या. पंढरपूरमध्ये मठ घेण्यासाठी देणग्या गोळा केल्या. घरातील शुभकार्याचा मुहूर्त काढण्यापासून ते मुलांचे शिक्षण, लग्न अशा महत्त्वाच्या कामांमध्ये महाराजांचा सल्ला घेतला. मात्र, त्याच महाराजांसमोर एका तरुणीला होणारी जीवघेणी मारहाण ते थांबवू शकले नाहीत. त्यांच्या सल्ल्याने झालेल्या मारहाणीत तरुणीचा जीव गेल्याने देवठाणे परिसरातील ग्रामस्थांमध्ये महाराजांबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
गुन्हा दाखल झाल्यामुळे देवठाणे मठाची आणि महाराजांची बदनामी होत आहे. हे थांबवण्यासाठी दोन्ही महाराजांनी स्वत:हून पोलिसात हजर होऊन खुलासा करणे गरजेचे आहे. ते समोर येत नसल्याने दोषी असल्याचा संशय बळावत आहे. त्यांनी तातडीने पोलिसांसमोर येऊन आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट करावे, अन्यथा मठाचा ताबा घेऊन महाराजांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती देवठाणे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
लक्ष्मीपुरी पोलिसांकडून तरुणीच्या खुनाचा सखोल तपास सुरू आहे. अजूनही अटकेतील संशयित आरोपी दोन्ही महाराजांना वाचवण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करीत आहेत. मठात घडलेला गैरप्रकार आणि दोन्ही महाराजांचे कारनामे चव्हाट्यावर आणल्याबद्दल देवठाणे येथील ग्रामस्थांनी 'लोकमत'चे अभिनंदन केले.
मारहाणीदरम्यान दोन्ही महाराज देवठाणे मठात
वैष्णवीला मारहाण झालेल्या रात्री दोन्ही महाराज देवठाणे येथील मठात होते. पहाटे वैष्णवीची प्रकृती बिघडताच दोन्ही महाराजांनी पलायन केले. गावाकडील एका मठात जातो, असे सांगून गेलेल्या महाराजांचा मोबाइल नंबर अद्याप बंदच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धार्मिक बाबींना विरोध नाहीच
मठातील मंदिर आणि धार्मिक कार्यांना कोणाचाच विरोध नाही. धार्मिक, आध्यात्मिक कार्यांना ग्रामस्थांचे समर्थन आहे. मात्र, त्याआडून काही गैरप्रकार होणार असतील तर ते खपवून घेतले जाणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. संशयित महाराजांचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध व्हावा, यासाठी पोलिसांना निवेदन देणार असल्याचेही ग्रामस्थांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मठाचा चांगला विनियोग होऊ शकतो
मठात सध्या एक मंदिर आणि दोन हॉल आहेत. समोरच्या स्वतंत्र हॉलमध्ये छोटे समारंभ होऊ शकतात. रिकाम्या जागेत लग्न समारंभ, स्वागत समारंभ होऊ शकतात. यातून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू शकते. तसेच मंदिर आणि मठाची देखभालही होऊ शकते. याबाबत विचार सुरू असल्याची माहिती ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.