‘देवचंद’च्या विद्यार्थ्यांनी थांबवले चिकोत्राचे प्रदूषण
By Admin | Published: January 28, 2015 12:42 AM2015-01-28T00:42:10+5:302015-01-28T01:00:06+5:30
वनराई बंधारे बांधले : खडकेवाड्यातील सांडपाणी थांबवले
म्हाकवे : विद्यार्थ्यांना कामाची सवय व्हावी, त्यांच्यावर सुसंस्कार व्हावेत, तसेच या युवा शक्तीच्या माध्यमातून समाजोपयोगी आणि विधायक कामे व्हावीत, यासाठी निपाणीतील देवचंद कॉलेजच्या एनएसएस विभागाने खडकेवाडा (ता. कागल) येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी खडकेवाड्यातील सर्व सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळण्यापासून रोखण्यासाठी ओढ्याला ठिकठिकाणी वनराई बंधारे घातले आणि नदीप्रदूषण थांबवले.
खडकेवाडा गावचे सर्व सांडपाणी एका मोठ्या ओढ्याद्वारे चिकोत्रा नदीला मिसळते. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नदीकाठावरील जॅकवेलला लागूनच हा ओढा वाहतो. याचा विचार होऊन शिबिराचे प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. विजय गायकवाड, सरपंच सुवर्णा जाधव, उपसरपंच आप्पासाहेब पोवार, माजी सरपंच जयसिंगराव जाधव, ग्रामसेवक एन. के. कुंभार यांनी शिबिरार्थी विद्यार्थ्यांबरोबर काम करून या ओढ्यावर वनराई बंधारे बांधले. त्यासाठी नदीतील वाळू पोत्यात भरून त्याचा वापर केला.
दरम्यान, या ओढ्यावर घालण्यात आलेले हे बंधारे अतिशय मजबूत बांधण्यात आले आहेत. याचा उपयोग ग्रामस्थांना भविष्यात अनेक वर्षांसाठी होणार आहे. या कामाची नोंद घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, गटविकास अधिकारी दीपक चव्हाण, प्राचार्य पी. एम. हेरेकर, आदींनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. कृषी सहायक संदीप कांबळे यांनीही याकामात प्रत्यक्ष सहभागी होऊन कामाचा दर्जा वाढवला.