डेअरीसाठी ऊर्जेच्या पुनर्वापराचे तंत्र विकसित
By Admin | Published: June 24, 2017 08:44 PM2017-06-24T20:44:53+5:302017-06-24T20:44:53+5:30
प्रा. पिसे यांचे संशोधन : शीतकरणामध्ये ५० टक्के विजेची बचत
संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : केआयटी कॉलेजमधील मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. एस. एम. पिसे यांनी दूध शीतकरणातील ऊर्जेच्या पुनर्वापराचे तंत्र (हीट एक्स्चेंजर) विकसित केले आहे. यामुळे दूध शीतकरणासाठी लागणाऱ्या विजेची ५० टक्के बचत होणार आहे.
दूध शीतकरणासाठी सध्या ग्रामीण भागात दूध संकलन केंद्रामध्ये ‘बल्क मिल्क कूलर’ हे शीतकरणीय यंत्र वापरले जाते. त्या ठिकाणी थंड झालेले दूध संघामध्ये पुढील प्रक्रियेसाठी टँकरने आणले जाते. ग्रामीण भागातील संकलन केंद्रामध्ये गरजेनुसार एक हजार ते पाच हजार लीटर क्षमतेचे मिल्क कूलर्स वापरले जातात. थंड केलेले दूध संघात पाठविल्यानंतर, शीतकरण केंद्रातील दूध थंड करण्यासाठी वापरली जाणारी सर्व उपकरणे, दूध थंड करणारा टँक, दूध संकलन केलेली जागा ही पुढील वापरापूर्वी गरम पाण्याने स्वच्छ करणे गरजेचे असते. यासाठी लागणारे पाणी गरम करण्यासाठी सध्या व्यावसायिक गॅस गिझर अथवा विद्युत हिटर्सचा वापर केला जातो. ३५ अंश सेल्सिअस तापमानापासून ४ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत १००० लीटर दूध थंड करण्यासाठी, सुमारे १८ युनिट्स इतकी वीज लागते. याशिवाय दुधाची भांडी, इतर उपकरणे स्वच्छ, निर्जंतुक करण्याकरिता पुन्हा तेवढीच वीज लागते.प्रा. पिसे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मोठे दूध प्रकल्प आणि विविध दूध शीतकरण केंद्रांना भेटी देऊन या गोष्टीचा अभ्यास केला. यातील संशोधनातून त्यांनी ‘हीट एक्स्चेंजर’चा उपाय शोधला. या हीट एक्स्चेंजरमुळे कोणताही वाढीव खर्च न करता, एक हजार लीटर दूध शीतकरणाच्या प्रक्रियेमध्ये ६० अंश तापमानाचे ३६० लीटर इतके गरम पाणी तयार होते. या संशोधनातून विद्युत ऊर्जेची ५० टक्क्यांनी बचत होते. दूध प्रक्रिया खर्च कमी होतो.
उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब
या संशोधनासाठी ‘नाबार्ड’ने रुरल इनोव्हेटिव्ह फंड योजनेंतर्गत ८ लाख ७५ हजारांचा निधी दिला होता. संशोधन पूर्ण झाल्यानंतर, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) आणि राजारामबापू पाटील सहकारी दूध संघातील (कृष्णा) तंत्रकुशल अभियंते आणि नाबार्डच्या तांत्रिक गटाने ‘केआयटी’मध्ये येऊन, या संशोधनाची सखोल पाहणी करून उपयुक्ततेवर शिक्कामोर्तब केले आहे.
- प्रा. एस. एम. पिसे
प्रा. पिसे हे मूळचे दानोळी (ता. शिरोळ) येथील आहेत. त्यांनी ‘हीट एक्स्चेंजर’ यावर पीएच.डी.चे संशोधन केले. त्यांनी ‘इन्व्हेस्टिगेशन आॅफ वेस्ट हीट रिकव्हरी फ्रॉम रेफ्रिजरेशन सीस्टिम’ हा शोधप्रबंध शिवाजी विद्यापीठाला सादर केला.