प्रथम शहराचा विकास करा
By admin | Published: March 23, 2015 11:45 PM2015-03-23T23:45:44+5:302015-03-24T00:11:00+5:30
हद्दवाढविरोधी कृती समिती : हद्दवाढ नाकारल्याने मानले शासनाचे आभार
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्राची हद्द वाढविल्यास १७ गावांतील शेती व समाजजीवनच धोक्यात येणार आहे. प्रथम शहराचा विकास करा, तेथे पायाभूत सुविधा पुरवा, मग हद्दवाढीचा विचार करा, असे मत माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारल्याबद्दल हद्दवाढविरोधी सर्वपक्षीय समितीतर्फे शासनाचे आभार मानण्यात आले.हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभावित १७ गावांतील शेती व दुग्ध उत्पादन, आदींसह अर्थव्यवस्थेलाच धक्का लागणार असल्याचे लक्षात आल्यानेच शासनाने हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारल्याचे मत शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी भगवान काटे, राजू ऊर्फ सुनील माने, बी. ए. पाटील, नाथाजी पोवार, सुरेश सूर्यवंशी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.सध्या महानगरपालिका शहरातील नागरिकांना नागरी सुविधा देऊ शकत नाही. त्यामुळे १७ गावांतील नागरिकांना त्या सुविधा देऊ शकणार नाही, असा दावा कृती समितीने केला. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांचे शहर विकासाकडे दुर्लक्ष झाले. महालक्ष्मी कृती आराखड्याच्या माध्यमातून विकास निधी आणता येईल, यासाठी कृती समिती लढा देण्यास तयार आहे. हद्दवाढीबाबत १७ गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेण्याच्या प्रयत्नाविरोधात शासनाने कौल दिला आहे. हद्दवाढ व शहराचा विकास याचा दुरान्वये संबंध नाही. हद्दवाढ झाल्यानंतर शहराचा कसा विकास होणार, हे एकदा पटवून द्यावे, असे आवाहन संपतराव पवार-पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
महापालिकेतील भ्रष्टाचाराचे दररोज एक प्रकरण दैनिकांतून प्रसिद्ध होत आहे. महासभेत शहर विकासाच्या एकाही मुद्द्यावर चर्चा होत नाही. त्यामुळे मोक्याच्या जागा लाटण्यासाठीच हद्दवाढ पाहिजे आहे का? अशी शंका येण्यासारखेच वातावरण आहे.
- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना