ग्रामीण कारागिरांसाठी ‘महाखादी ब्रॅँड’ विकसित करू : एम. निलिमा केरकट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 08:30 PM2019-02-18T20:30:50+5:302019-02-18T20:33:18+5:30
कोल्हापूर : ग्रामीण कारागीरांच्या वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ‘महा खादी ब्रॅन्ड’ विकसित ...
कोल्हापूर : ग्रामीण कारागीरांच्या वस्तू आणि उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ‘महाखादी ब्रॅन्ड’ विकसित केला जाईल. त्या माध्यमातून कारागीरांच्या उत्पादनाच्या खरेदी आणि विक्रीची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. निलिमा केरकट्टा यांनी सोमवारी दिली.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात श्रीबाळकृष्ण हवेली मंदिर येथे पाच दिवसांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होत्या.
प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी दत्तात्रय कुरुंदवाडे, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, आदींची होती.
यावेळी डॉ. एम. निलिमा केरकट्टा यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. केरकट्टा म्हणाल्या, महाखादी ब्रॅन्डच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कारागीरांच्या उत्पादनांची घरोघर जाऊन खरेदी करून त्यांची देशाच्या बाजारपेठेत विक्री करण्याची स्वतंत्र यंत्रणा विकसित केली जात आहे. या यंत्रणेद्वारे कारागीरांच्या उत्पादनाच्या केलेल्या खरेदीची रक्कम ४५ दिवसांत दिली जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ग्रामीण कारागिरांनी आपल्या उत्पादनाची नोंदणी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा खादी व ग्रामोद्योग अधिकाऱ्याकडे करावी. महाखादी ब्रॅन्डबरोबरच ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांना मुख्यमंत्र्यांच्या महालाभार्थी पोर्टलशी जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ग्रामीण कारागीरांच्या उत्पादनांना जगाची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी महामंडळाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत संकेतस्थळ विकसित करून त्यावर उद्योजकांची नोंदणी करून घ्यावी. याकामी जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल.
खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मोहन कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार डांगर यांनी आभार मानले.
प्रदर्शनात ३५ स्टॉल्स
हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये शुद्ध व सेंद्रिय मध, सेंद्रिय हळद, मसाले, आयुर्वेदिक औषधे, खानदेशी पापड, बांबूपासून बनविलेल्या वस्तू, तसेच शोभीवंत वस्तू, मधमाशा पालनासाठीचे साहित्य, खादी कापड, साबण, बेदाणे, फर्निचर, कपडे, कोल्हापुरी चप्पल, गांडूळ खत, सुगंधी उदबत्ती, फरसाण, गुळ काकवी, घोंगडी असे ३५ स्टॉल्स आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्या दिवशी गर्दी होती.