विकास संस्थांची रणधुमाळी
By Admin | Published: December 24, 2014 11:03 PM2014-12-24T23:03:18+5:302014-12-25T00:10:44+5:30
ग्रामीण राजकारण तापणार : पहिल्या टप्प्यात १५ संस्थांचा कार्यक्रम
कोल्हापूर : ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विकास सेवा संस्थांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. ‘क’ वर्गातील संस्थांची प्रक्रिया सुरू आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या करवीर व कागल तालुक्यांतील ‘ब’ वर्गातील मोठ्या विकास संस्थांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने ऐन थंडीत ग्रामीण राजकारण तापणार आहे.
गेले दोन महिने सहकारी संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. आॅक्टोबर २०१४ अखेर जिल्ह्यात ‘ब’ वर्ग ८००, ‘क’ वर्ग १७१४, तर ६५२ दूध संस्था निवडणुकीस पात्र आहेत. पहिल्या टप्प्यात ‘ड’ वर्गातील संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. आता ‘क’ वर्गातील विकास, दूध, पाणीपुरवठा, पतसंस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत. गावातील राजकीय सूत्रे ताब्यात ठेवण्यासाठी विकास व दूध संस्था ताब्यात असणे गरजेचे असते. यासाठी गटा-तटातील राजकारण उफाळून येत असते. ‘ब’ वर्गात मोठ्या विकास संस्थांचा सहभाग असल्याने या संस्थेची निवडणूक प्रतिष्ठेची केली जाते. सध्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून या संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात १५ विकास संस्थांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, यामध्ये करवीर तालुक्यातील सात, तर कागल तालुक्यातील आठ विकास संस्थांचा समावेश आहे. या संस्थांची प्रारूप (कच्ची) मतदार यादी २३ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली. या यादीवर १ जानेवारीपर्यंत हरकती घेता येणार असून, ६ जानेवारीला हरकतींवर निर्णय होईल. ९ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी १५ संस्थांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले.