राजकारणात शहराचा विकास खुंटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:11 AM2017-11-20T00:11:16+5:302017-11-20T00:15:33+5:30
संदीप बावचे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : ताराराणी आघाडीचा नगराध्यक्ष आणि शाहू आघाडीचे बहुमत त्यातून सुरू असलेली आघाड्यांची वर्चस्वाची लढाई! या सत्तेच्या राजकारणात जयसिंगपूर शहराचा विकास मात्र खुंटत आहे. पालिकेत विकासाचे राजकारण अपेक्षित असताना प्रत्यक्षात विकास बाजूला पडला असून, केवळ राजकारण सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
निवडणुकीत दिलेल्या विकासाच्या आश्वासनांचा जणू विसरच पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नव्या सभागृहाची सुरुवात कचरा प्रश्नावरूनच झाली. पहिल्या सभेतच शाहू व ताराराणी आघाडीने एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपनगराध्यक्ष कक्षावरून दोन्ही आघाड्यातील वाद आणखी उफाळून आला. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हा वाद संपतो ना संपतो असे चित्र असताना वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जॅकवेलच्या निधी मंजुरीवरून दोन्ही आघाड्यांत श्रेयवाद रंगला. आरोप-प्रत्यारोपांमुळे पालिकेचे राजकारण पुन्हा चर्चेत राहिले. झेंडावंदनाच्या कार्यक्रमपत्रिकेतील नावावरून पुन्हा धुमशान झाले. पालिकेच्या सभेतील विषयावरून आणि निधीवरून दोन्ही आघाड्यांत खडाजंगी पहायला मिळत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे ६० कोटी रुपये खर्चाची भुयारी गटर योजना वादात सापडली आहे. भुयारी गटर योजनेमुळे शहरातील रस्ते व गटारींची कामे करू नयेत, असा शासनाचा नवीन आदेश असल्यामुळे नगरसेवकांना आपल्या प्रभागातील रस्ते व गटारींची कामे करता येणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मोकाट जनावरांच्या प्रश्नावरून गेल्या तीन सभेत केवळ चर्चा होताना दिसते. मात्र, ठोस उपाययोजना होत नाही
चिपरी हद्दीत कचरा टाकण्यास विरोध झाल्यानंतर शहरातील कचºयाचा प्रश्न गाजला. अखेर नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या पुढाकारातून तो प्रश्न तात्पुरता निकाली निघाला. घनकचरा प्रकल्प राबविण्यासाठी पालिकेने नवीन जागा घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला असला तरी त्याचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे. शाहू आघाडीकडून बहुमताच्या जोरावर विषय मंजूर करून घेतले जात आहेत. साठ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यावरून बैठकीत शाहू व ताराराणी आघाडीत वादळी चर्चा झाली. त्यातून शाहू आघाडीने मतातून हा विषय मंजूर करून घेतला. येत्या डिसेंबरमध्ये नव्या सभागृहाची वर्षपूर्ती होत आहे. मात्र, सत्तेच्या राजकारणात शहराचा विकास खुंटला असल्याचे चित्र असल्यामुळे दोन्ही आघाड्यांनी येणाºया काळात शहर विकासाचा अजेंडा पुन्हा हाती घ्यावा, अशीच अपेक्षा शहरवासीयांतून होत आहे.
‘ताराराणी’त समन्वयाचा अभाव
पालिका सभेत ताराराणी आघाडीचा अभ्यास कमी दिसून येत आहे. ताराराणीच्या काही नगरसेवकांकडून सभेतील वाचन होणाºया विषयाबाबत प्रशासनाला माहिती विचारली जाते. वास्तविक सभेपूर्वी विषयपत्रिका प्रत्येक नगरसेवकाला दिली जाते. त्यामुळे सभेत होणाºया विषयाचा अभ्यास न करताच नगरसेवक सभेला सामोरे जातात. वर्षपूर्ती होण्याअगोदरच ताराराणी आघाडीत समन्वयाचा अभाव दिसून येत आहे.