Teachers Day - शिक्षकांमुळेच नेतृत्वगुणांचा विकास - डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:18 PM2019-09-05T14:18:17+5:302019-09-05T14:39:39+5:30

आज मी जो काही आहे तो शिक्षकांमुळेच!...’ महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करीत होते.

 The development of leadership qualities is due to the teachers - Dr. Mallinath Kalshetti | Teachers Day - शिक्षकांमुळेच नेतृत्वगुणांचा विकास - डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

Teachers Day - शिक्षकांमुळेच नेतृत्वगुणांचा विकास - डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

Next
ठळक मुद्दे शिक्षकांमुळेच नेतृत्वगुणांचा विकास - डॉ. मल्लिनाथ कलशेट्टीमित्रामुळे मिळाला कॉलेजमध्ये प्रवेश

भारत चव्हाण 

कोल्हापूर : ‘घरी आई निरक्षर. वडिलांचेही जेमतेम शिक्षण. सहा बहिणी. मी सगळ्यांत धाकटा. वळसंग (सोलापूर)सारख्या दुष्काळी भागातील चार एकर शेतजमीन आणि म्हैस हेच काय ते आमचे उदरनिर्वाहाचे साधन. त्यातच मी पाच वर्षांचा असताना वडील गेले. आईने मोठ्या कष्टाने आम्हा भावंडांचा सांभाळ केला.

घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे शिक्षण घेणे शक्य नव्हते; परंतु शिक्षकांची प्रेरणा व प्रोत्साहनामुळे शिक्षण घेता आले, तेसुद्धा पीएच. डी.पर्यंत. प्रत्येक वळणावर शिक्षकच मदतीला धावून आले. त्यांच्यामुळेच माझ्यात नेतृत्वगुणांचा विकास झाला. आज मी जो काही आहे तो शिक्षकांमुळेच!...’ महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करीत होते.

शिक्षण घेण्यासारखी माझी परिस्थितीच नव्हती. म्हशीची दूधविक्री आणि चार एकर जमिनीत उगवणाऱ्या जेमतेम धान्यावरच आमचा उदरनिर्वाह सुरू होता. शाळेत जाण्याच्या वयात मलाही शाळेचा दरवाजा भुरळ पाडायचा. घराजवळच शाळा. एकच मुलगा असल्याने मला पहिलीत घातले.

व्ही. सी. दुधगी हे शाळेचे मुख्याध्यापक. ते अत्यंत कडक शिस्तीचे. त्यांच्यासमोर जायलाही भीती वाटायची. त्याच शाळेत बलभीम फुलारी नावाचे गुरुजी शाळेत मुक्कामाला असायचे. त्यांना चहा, पाणी, डबा देण्याचे काम मी अगदी आदरपूर्वक स्वीकारले. त्यांच्यामुळे शाळेची साफसाफाई करण्याची मला सवय लागली.

शिक्षकांचे सतत प्रोत्साहन मिळत राहिल्याने माझाही आत्मविश्वास वाढत होता. पाचवी ते सातवी सतत दुसरा व तिसरा क्रमांक मिळवीत गेलो. आठवी व नववीत वर्गात पहिला येण्याचा मान मिळविला.

दहावीमध्ये प्रथम येण्याचा मान कन्नडभाषिक विद्यार्थ्यांना मिळत असे; पण मी आठवीतच ठरवून टाकले, आपण दहावीत पहिला क्रमांक मिळवायचाच! घडलेही तसेच. सर्व विक्रम मोडून मी पहिला आलो. शिक्षकांचे मार्गदर्शनच याला कारणीभूत ठरले. कष्ट, जिद्द , प्रामाणिकपणा याची बीजे याच शाळेत रुजली. व्यक्तिमत्त्व, वक्तृत्व येथेच घडले.

मित्रामुळे मिळाला कॉलेजमध्ये प्रवेश

दहावीत पहिला आल्यानंतरही आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेणे अवघड होते. अकरावीचे सगळे प्रवेश संपले, तरीसुद्धा मी गावातच होतो. दुधगी सरांचा मुलगा मनोहर माझ्या मदतीला आला. त्याने मला सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये प्राचार्य के. भोगिशयन यांच्याकडे नेले. त्यांनी प्रतीक्षा यादीवर माझे नाव टाकले.

पुढे प्रवेश मिळाला; पण हॉस्टेलवर राहण्याची पंचायतच होती. एका खोलीत तीन कॉट असायचे. मी खोलीत चौथा विद्यार्थी. जमिनीवर झोपण्याच्या अटीवर प्रवेश द्या, अशी त्यांना विनंती केली. रेक्टर सी. एच. सावेकर यांनी ती मान्य केली. गावाकडून एस.टी.ने जेवणाचा डबा यायचा. पुढे एकाच कॉलेजमध्ये मी एम.एस.सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले.

प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण

शिक्षक किंवा प्राध्यापक होण्याचे माझे स्वप्न होते. संगमेश्वर कॉलेजच्या प्राचार्य के. भोगिशयन यांनी केलेल्या संस्कारांमुळे मी प्राध्यापकही झालो. पाच वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. कॉलेजजीवनात राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी असताना एम. आर. शहा यांचेही मार्गदर्शन लाभले.

सी. आर., आदर्श विद्यार्थी, जी. एस. अशा पदांवर माझी निवड झाली. त्यामुळे माझे व्यक्तिमत्त्व घडत गेले. स्टुडंट कौन्सिलच्या कल्चरल डिपार्टमेंटचा मी चेअरमन झालो. निवडीच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्यात नेतृत्वगुण विकसित होत गेले. माझ्या प्रयत्नांमुळे सोलापूरला ‘एमएससी’चे सेंटर सुरू झाले.

फुले-शाहू-आंबेडकर विचार रुजले

सतत शिक्षण घेत राहणे, सामाजिक कामाची आवड जोपासत राहणे माझ्या अंगवळणी पडले. पुढे एमपीएससी होऊन सरकारी नोकरी मिळाली. नोकरी करीत असताना संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानावर पीएच.डी. केली. तेव्हा मला भारती विद्यापीठातील प्रा. के. जी. पठाण यांचे मोलाची मदत झाली. प्रशासकीय सेवेत असताना बॅरिस्टर पी. जी. पाटील यांचे मार्गदर्शन झाले. संपूर्ण विद्यार्थिजीवनात प्रा. डी. यू. पवार यांचेही सतत मार्गदर्शन होत राहिले.

शिक्षकांमुळे माझ्यात फुले-शाहू-आंबेडकर यांचे संस्कार, विचार रुजले. याच विचारांवर माझी वाटचाल सुरू आहे. माझ्या जीवनात आलेले सर्वच शिक्षक माझ्या यशस्वी जीवनाचे वाटाडे आहेत. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालण्याचे आजही प्रामाणिकपणे व जिद्दीने प्रयत्न करीत आहे.

दहावीनंतर विजार-शर्ट मिळाला

घरी आर्थिक दारिद्र्य असल्यामुळे शाळेचा गणवेश हाच आमचा पोशाख राहिला. दहावी पास होऊन कॉलेजला गेल्यावरच विजार, शर्ट व स्लिपर मिळाले. तोपर्यंत अनवाणीच चालत असे. केवळ शिकण्याची हौस आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच इथपर्यंत पोहोचू शकलो. शिकण्यासाठी केवळ आर्थिक परिस्थितीच नाही तर योग्य शिक्षक व मार्गदर्शनही होणे आवश्यक असते. तुमच्याकडे जिद्द असेल तर सर्व परिस्थितीवर मात करता येते.
 

 

Web Title:  The development of leadership qualities is due to the teachers - Dr. Mallinath Kalshetti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.