Kolhapur: तिरूपतीच्या धर्तीवर जोतिबा देवस्थानाचा विकास, चार टप्प्यांत १८१६ कोटींचा आराखडा
By समीर देशपांडे | Published: July 9, 2024 04:48 PM2024-07-09T16:48:17+5:302024-07-09T16:48:54+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनच्या राजाच्या जोतिबा देवस्थानचा चार टप्प्यांत विकास करण्याचा आराखडा ...
समीर देशपांडे
कोल्हापूर : महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनच्या राजाच्या जोतिबा देवस्थानचा चार टप्प्यांत विकास करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तब्बल १८१६ कोटी ११ लाख रुपयांचा हा एकूण प्रकल्प तयार करण्यात आला असून, यामध्ये डोंगर परिसराबरोबरच परिसरातील २३ गावांच्या विकासकामांचाही समावेश आहे. मात्र, अंबाबाई देवस्थानच्या विकासाची गती पाहता हा प्रकल्प गतीने पूर्ण करणे आव्हानात्मक ठरणार आहे. आमदार विनय कोरे यांच्या संकल्पनेतून हे प्राधिकरण स्थापण्यात आले आहे.
मुंबई येथे २३ जानेवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र जोतिबा तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरण निर्मितीबाबत पहिली बैठक झाली. यानंतर आराखडा तयार करण्याबाबत विविध बैठका होऊन ११ जानेवारी २०२४ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय बैठकीत आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. वाडी रत्नागिरीची सध्याची लोकसंख्या ६,३०० असून, यामध्ये ५५ टक्के पुरुष आणि ४५ टक्के महिला आहेत.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबाच्या दर्शनासाठी महिन्याला लाखो भाविक येतात. कोल्हापूर शहर आणि परिसरातून दर रविवारी जाेतिबाला हजारो भाविक जात असतात. एकूणच वर्षभर या ठिकाणी येणारे भाविक, त्यांची वाहने, त्यांच्यासाठी असलेल्या सुविधा, भविष्यात होणारी गर्दी आणि अपुऱ्या पडणाऱ्या सुविधा यांचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तिरूपतीच्या धर्तीवर जोतिबा डोंगराचा विकास करण्याचा शासनाचा मानस असून, त्यादृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे. हा आराखडा तयार करताना रस्ते, मंदिर परिसरापासून परिसरातील २३ गावांमध्ये काय करता येईल, याचाही विचार केला आहे.
डोंगरावर फेब्रुवारी मार्चमध्ये रविवारी होणारे पाच खेटे, चैत्र यात्रेच्या आधी तीन दिवस, मुख्य यात्रा आणि नंतरचे तीन दिवस, चैत्र महिना, पाकाळणी यात्रा, उन्हाळी सुटी, श्रावण षष्ठी यात्रा, नगर प्रदक्षिणा, दसरा, दिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमा, पौर्णिमा, ११ मारुती दिंडी, नाताळ सुटी, प्रत्येक रविवार आणि सोमवार ते शनिवार जोतिबा डोंगरावर लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांचा विचार करून मूलभूत सोयीसुविधा उभारण्यासाठीच्या या आराखड्याच्या मंजुरीला किती वेळ लागतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
सध्याच्या अडचणी
- यात्रा काळात होणारी प्रचंड गर्दी, चैत्र यात्रेला मंदिर परिसरात एका भाविकासाठी १/१ फूट जागाही उभे राहण्यासाठी मिळत नाही.
- इतर वेळीही दर्शन रांगेला होणारी गर्दी
- अपुरी पार्किंग व्यवस्था
- भजन, कीर्तनासाठी अपुरी सोय
- बसस्थानक आणि सुविधा केंद्रांच्या अडचणी
- अल्पोपाहार आणि भोजनासाठीच्या अपुऱ्या सुविधा
- जागेच्या कमतरतेमुळे घरांच्या उंचीत झालेली वाढ
- डोंगरावर येणाऱ्या पायवाटांची दुरवस्था
- मंदिर परिसरातील अपु्ऱ्या सोयीसुविधा
- भाविकांची यात्रा काळात होणारी निवासाची गैरसोय
- परिसरातील मंदिरे आणि तलावांची झाले पडझड
- उघड्यावर टाकण्यात येत असलेला घनकचरा
- दुर्लक्षित बौद्धकालीन लेणी
- सांडपाण्याच्या योग्य निचऱ्याचा अभाव
पहिल्या टप्प्यातील नियोजित विकासकामे
- दक्षिण दिग्विजयोत्सव मैदान, दुकानगाळ्यांसहित खुला रंगमंच
- नवे तळे परिसरात १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती
- शासकीय निवासस्थान
- नियोजित अन्नछत्र
- ज्योतीस्तंभ व ध्यानधारणा केंद्र
- केदार विजय उद्यान
- दर्शनरांग
- सुविधा केंद्र आणि पाणपोई
- वाहनतळ
- माहिती केंद्र
- विविध तलाव आणि मंदिरांची सुधारणा
गतवर्षी - वर्षभरात डोंगरावर आलेले भाविक
- सोमवार ते शनिवार - १६ लाख ६४ हजार
- फक्त रविवारी - १६ लाख
- यात्राकाळ - ४२ लाख ७५ हजार
- उत्सवकाळ - ३२ लाख
- इतर दिवशी - २४ लाख ४५ हजार
- एकूण - १ कोटी ३१ लाख ८४ हजार
डोंगरावर येणारे रस्ते
- वाघबीळ चौक ते वाडी रत्नागिरी ६.२ किमी
- कोल्हापूर केर्लीमार्गे येणारा रस्ता २०.८ किमी
- कोल्हापूर कसबा बावडा मार्गे रस्ता १९.८ किमी
- टोप कासारवाडी राष्ट्रीय महामार्गावरून २७.८ किमी