Kolhapur- जोतिबा डोंगर विकासाचं 'चांगभलं': तिरुपतीच्या धर्तीवर विकास म्हणजे विस्थापनाची भीती
By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 19, 2025 16:47 IST2025-03-19T16:46:32+5:302025-03-19T16:47:14+5:30
जोतिबा ग्रामस्थांमध्ये संभ्रम : आम्हाला विश्वासात का घेत नाही हाच प्रश्न

Kolhapur- जोतिबा डोंगर विकासाचं 'चांगभलं': तिरुपतीच्या धर्तीवर विकास म्हणजे विस्थापनाची भीती
इंदुमती गणेश
कोल्हापूर : आमचा जोतिबा विकास प्राधिकरणाला विरोध नाही; पण विकास म्हणजे नेमके काय करणार हे स्पष्ट नाही. तिरुपतीच्या धर्तीवर म्हणजे डोंगरावरील गाव पायथ्याशी वसवणार का?, आम्हाला पर्यायी जागा देणार की घरे देणार? की नुकसानभरपाईची रक्कम देणार? आजवर जेवढे विकास प्रकल्प झाले. पाटबंधारे प्रकल्प झाले त्यापैकी एकाही प्रकल्पातील बाधितांना न्याय मिळालेला नाही मग आमचेही असेच होणार का? असे अनेक प्रश्न जोतिबा ग्रामस्थांमध्ये आहेत.
पन्हाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पुढील पंधरा दिवसांत प्राधिकरणाची स्थापना करू हे जाहीर केल्यापासून जोतिबा डोंगरावरील रहिवाशांमध्ये गोंधळल्याचे वातावरण आहे. आमदार विनय कोरे यांनी या कार्यक्रमात एकाही माणसाचे विस्थापन न करता जोतिबा मंदिराचा विकास करण्याची ग्वाही दिली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोतिबा विकास आराखडा बनवला जात आहे, तो दोनवेळा शासनाला पाठवला गेला, त्रुटी दूर करण्यात आल्या; पण हे सगळं जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्त्व खाते, वास्तुविशारद अशा मोजक्या लोकांमध्येच फिरत आहे.
वास्तवात तिथे राहणाऱ्या नागरिकांना तेथील भौगोलिक परिस्थितीची अधिक चांगली माहिती असताना आराखडा बनवताना त्यांना अजिबातच विश्वासात घेतले गेलेले नाही ही त्यांची मूळ तक्रार आहे. आम्ही सगळं वृत्तपत्रांतूनच वाचत आहोत. प्रत्यक्षात ग्रामपंचायत, देवाचे धार्मिक विधी करणारे गुरव व ग्रामस्थ आराखड्याबाबत अंधारात आहेत.
सुंदर जोतिबा प्रकल्पातील कामे अपुरी राहिल्याने नवीन प्रश्न निर्माण झाले. असेच प्राधिकरणच्या बाबतीत झाले तर काय, याची चिंता आहे. विकास जरूर करा; पण आमच्या गरजा, प्रश्न आणि भौगोलिक स्थिती लक्षात घ्या एवढेच जोतिबा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
समाधान करायला हवे
तिरुपतीच्या धर्तीवर म्हणजे ग्रामस्थांना डोंगरावरून खालच्या गावांमध्ये विस्थापित व्हावे लागेल, याची भीती आहे. बरं स्थलांतर व्हायला पण काही हरकत नाही; पण याआधी झालेल्या सगळ्या प्रकल्पांचा बाधितांना वाईट अनुभव आहे. आमचेही तसेच झाले तर रस्त्यावर यावे लागेल, अशी शंका आहे. त्यांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे हवी आहेत.
धार्मिक विधी कसे करणार?
जोतिबावर ८० टक्के ग्रामस्थ हे देवाचे धार्मिक विधी करणारे गुरव आहेत. विस्थापित व्हावे लागले तरी त्यांची २ ते ३ किलोमीटर, डोंगराच्या पायथ्यालाच किंवा मंदिराच्या आवारातच काही खोल्या बांधून आठवडा असणाऱ्या गुरवांसाठी सुविधा निर्माण कराव्या लागतील. अन्यथा देवाच्या धार्मिक विधीत अडचणी येऊ शकतात.
जोतिबा डोंगराचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे; पण प्रशासनाने आराखडा करताना ग्रामपंचायतीला व ग्रामस्थांना विश्वासात घेणे गरजेचे होते. अजूनही आम्हाला आराखड्यात नेमके काय आहे माहिती नाही. येथे स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा अभाव हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक व्हावी. ग्रामस्थांचा उदरनिर्वाह डोंगरावर अवलंबून आहे, त्याचा आराखड्यात विचार व्हावा. - राधा बुणे, माजी सरपंच