पर्यटनवाढीसाठी पंचगंगा घाटाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:48 AM2018-03-26T00:48:59+5:302018-03-26T00:48:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पर्यटनवाढीसाठी पंचगंगा नदीघाट विकसित करणे आवश्यक असून, सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल; त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापुरात पंचगंगा नदीघाट विकसित करण्याच्या योजनेचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही ठिकाणे विकसित करून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पर्यटन वाढले तरच आपोआपच रोजगारही उपलब्ध होतील. हाच उद्देश ठेवून पंचगंगा घाट विकसित करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपये खर्चातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान करण्यात येत असून दोन वर्षांतच पंचगंगा घाट परिसर शहरवासीयांचे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनेल. सकाळी नदीवर पोहण्यासाठी येणाऱ्यांना चेंजिंग रूम्स आणि स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात मोठे उद्योगधंदे येण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामुळे किमान चार ते पाच हजार लोकांना कामधंदा मिळेल, असा आशावाद त्यांनी केला.
पंचगंगा नदीचे प्रदूषण हा मोठा प्रश्न बनल्याने तो सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
शाहू छत्रपती यांनीही, घाट सुशोभीकरणासह शुद्धीकरणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नियोजन अधिकारी सरिता यादव, स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, किरण नकाते, रूपाराणी निकम, माधवी गवंडी, सरिता मोरे, आदी उपस्थित होते.
पर्यटनवाढीसाठी दोन महिने सहलीचे
जिल्ह्यात १५ एप्रिलपासून दोन महिने पर्यटन सहलींचे आयोजन केले असून, आठवड्यातून किमान दोन दिवस सहलींचे आयोजन केले आहे. सहभागी पर्यटकांची राहण्याची, भोजनाची, वाहनाची सोय केली जाईल. पर्यटकांना जिल्ह्यातील दुर्लक्षित आठ स्थळे दाखविण्यात येणार आहेत. राधानगरीत सुमारे आठ हजार फुलपाखरांची बाग विकसित करून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
पुरातन मंदिरेही विकसित
पंचगंगा नदीपात्रात व परिसरात अनेक पुरातन मंदिरे, दीपमाळा असल्याने त्यांचीही डागडुजी करून त्याही सुशोभित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशीही घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.
गावांनी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करावेत
मंत्री पाटील म्हणाले, पंचगंगेचे शुद्धिकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. पंचगंगा आणि रंकाळ्यात सांडपाणी मिसळणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत; तसेच पाळीव जनावरे धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करू. नदीकाठच्या गावांनीही प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी नदीत सोडण्याऐवजी गावातच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारावेत. त्यासाठी निधी देऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले.