२८९ कोटींचा विकास आराखडा
By admin | Published: June 17, 2014 01:29 AM2014-06-17T01:29:45+5:302014-06-17T01:46:40+5:30
पालकमंत्री : जुलैपासून कामे सुरू करण्याचे आदेश
कोल्हापूर : जिल्ह्याचा सन २०१४-२०१५ सालाचा २८९ कोटी ५७ लाखांचा वार्षिक नियोजन आराखडा मंजूर करण्यात आला असून, कोणत्याही परिस्थितीत १ जुलैपासून नियोजनाप्रमाणे कामे सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७ कोटी ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी विकासकामांसाठी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.
गतवर्षी २५३ कोटी ९७ लाखांचा जिल्हा वार्षिक नियोजनाचा आराखडा करण्यात आला होता. त्यातील २४६ कोटी ७५ लाखांचा निधी राज्य सरकारकडून वितरीत करण्यात आला. त्यापैकी २४५ कोटी ५३ लाखांचा निधी खर्च झाला. गतवर्षात कराचे उत्पन्न चांगले मिळाले, वीज बिल वसुली चांगली झाली. वीजगळतीचे प्रमाण कमी झाले. याचा चांगला परिणाम यंदाच्या विकास आराखड्यावर झालेला पाहायला मिळाला. यंदा २७ कोटी ५० लाखांचा जादा निधी मिळाला. नवीन वर्षात करावयाच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या दहा दिवसांत आर्थिक तसेच प्रशासकीय मान्यता दिली पाहिजे आणि १ जुलैपासून कामे सुरूच झाली पाहिजेत, असे आदेश आज, सोमवारच्या जिल्हा नियोजन आढावा बैठकीत देण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
डोंगरी विकास तसेच स्थानिक विकास निधीतून करावयाच्या कामांच्या याद्या सात दिवसांच्या आत आमदारांनी द्याव्यात; तसेच २७ जूनपासून या याद्यांप्रमाणे कामे सुरू झाली पाहिजेत, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. यापूर्वी नियोजन विभागाने ६० टक्के रक्कम खर्च करावी, असे आदेश होते; परंतु वित्त विभागाने हे बंधन काढून सर्व रक्कम खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामे होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्याला २८९ कोटींपैैकी ७१ कोटींचा निधी मिळाला असून, उर्वरित निधीही लवकर मिळेल, असा विश्वास त्यांनी दिला.
आजच्या आढावा बैठकीत हुतात्मा स्मारके व माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेत आला. जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांची दुरवस्था झाली असून, त्यांची दुरुस्ती तत्काळ हाती घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तेव्हा स्मारके दुरुस्तीचा विशेष कार्यक्रम हाती घेण्यात यावा, असा आदेश देण्यात आला आहे. त्याचबरोबर माणगाव येथील डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठी २० कोटींचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पातून मिळाला असून, या स्मारकासाठी लागणाऱ्या जमिनीचा खर्च कोणी द्यायचा, यावर निर्णय घेण्यासाठी उद्या, मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)