विकासकामांत अडथळे आणू नयेत
By admin | Published: April 18, 2017 01:01 AM2017-04-18T01:01:22+5:302017-04-18T01:01:22+5:30
मलकापूर नगरपालिका सभा : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक कारभार
मलकापूर : विरोधकांनी विकासकामांत अडथळे आणू
नयेत, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक कारभार करून महाराष्ट्रात पालिकेच्या कारभाराचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी केले. मलकापूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
प्रभारी मुख्याधिकारी श्याम गोसावी यांनी स्वागत केले. रेडझोनमध्ये बांधकाम करण्यास कोणाची परवानगी घेतली. टेंडर नोटीस काढताना विरोधकांना विश्वासात घ्या, असा प्रश्न विरोधी आघाडीचे सदस्य सुहास पाटील यांनी मांडला. यावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांत खडाजंगी झाली. पालिकेच्या सर्वसाधारण सभेची संमती घेऊन भाजी मार्केट, ब्रह्मपुरी रस्ता, आदी कामांना रितसर परवानगी घेऊन कामे सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत एक कोटी ६४ लाख रुपयांचा निधी परत घालविला आहे. भाजी मार्केट इमारत व ब्रह्मपुरी रस्ता यामध्ये पालिकेचे पैसे वाचलेले आहेत. टेंडर कमी दराची मंजूर केली आहेत. विकासकामात विरोधकांनी अडथळा आणू नये, असे नगराध्यक्ष अमोल केसरकर, बांधकाम सभापती राजू प्रभावळकर, उपनगराध्याक्ष दिलीप पाटील यांनी उत्तर दिले.
मंगळवार पेठेतील बांधकाम करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे का? वर्क आॅर्डर लाईन आऊट दिली का? असा प्रश्न सुहास पाटील यांनी मांडला. सदरचे काम करण्यास पालिकेने परवानगी दिलेली आहे, असे नगराध्यक्ष यांनी सांगितले. शहरातील नागरिकांनी रेडझोनमध्ये बांधकामे सुरू केली आहेत. त्यांना प्रशासनाने अडथळे आणू नयेत. विरोधकांना विश्वासात घेऊन विकासकामे राबवावीत, असे सुहास पाटील, माया पाटील, आण्णा पळसे यांनी प्रश्न उपस्थित केला.
पालिका शिपाई राजेंद्र भारती याने पाणीपट्टी करवसुलीत घोटाळा केला होता. त्याला निलंबित केले होते. मागील बॉडीने त्याला कामावर घेऊन त्याचा पगार काढला आहे. जनतेत गैरसमज पसरवू नका, असे राजू प्रभावळकर यांनी सांगितले. पुढील पाच वर्षांचे २० लाख रुपये सांगलीतील लाईट ठेकेदाराला का दिले? याचे विरोधकांनी उत्तर द्यावे, असे प्रभावळकर, विकास देशमाने, मानसिंग कांबळे यांनी सांगितले. दिलीप पाटील यांनी आभार मानले.