आधुनिक तंत्रज्ञानामुळेच वस्त्रोद्योगाचा विकास
By admin | Published: April 30, 2015 09:17 PM2015-04-30T21:17:42+5:302015-05-01T00:15:27+5:30
कल्लाप्पाण्णा आवाडे : इचलकरंजीत टेक्स्पोजर-२०१५ यंत्रसामग्री प्रदर्शन, परिषदेस प्रारंभ
इचलकरंजी : देशाच्या वस्त्रोद्योगामध्ये विकेंद्रित क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इचलकरंजीची प्रगती कौतुकास्पद आहे. जुन्या पिढीतील उद्योजक व कामगार वर्गाने केलेले कष्ट आणि वस्त्रोद्योगामध्ये आणलेले आधुनिक तंत्रज्ञान यामुळेच येथील वस्त्रोद्योगाचा विकास झाला. आता इचलकरंजी शहराला वस्त्रोद्योगाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात महत्त्वाचे स्थान पटकावयाचे असून, त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या यंत्रसामग्रीच्या प्रदर्शनाचा मोठा फायदा होईल, असे उद्गार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी काढले.शहरामधील मॉडर्न स्कूलजवळील मैदानात भरविण्यात आलेल्या टेक्स्पोजर - २०१५ या वस्त्रोद्योगातील यंत्रसामग्री प्रदर्शन आणि परिषद यांच्या प्रारंभाच्या कार्यक्रमात माजी खासदार आवाडे बोलत होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आपल्या भाषणात रोटरीचे प्रांतपाल गणेश भट्ट म्हणाले, टेक्स्पोजरसारख्या उपक्रमातून उद्योजकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व नवीन उत्पादनाची संधी उपलब्ध होईल. ज्यामुळे आणखीन रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळेल. यावेळी आपल्या प्रमुख भाषणामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीतील वस्त्रोद्योगात असलेल्या विविधतेचा आढावा घेतला व सध्याच्या नवीन पिढीतील उद्योजक वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणाकडे वाटचाल करीत असल्याचे सांगितले.सुरुवातीला रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष अमर डोंगरे यांनी स्वागत व
प्रा. यू. जे. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सत्यनारायण रांदड यांनी प्रदर्शन व परिषदेविषयी माहिती सांगितली. प्रा. एम. वाय. गुडियावाल व राजेंद्र सांगले यांनी स्मरणिकेचे प्रकाशन केले. यतिराज भंडारी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)