विकासाभिमुख पेठवडगाव नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:41 AM2019-07-15T00:41:53+5:302019-07-15T00:41:57+5:30

सुहास जाधव। लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : जिल्ह्यात प्रथम १८८३-८४ साली फक्तचार नगरपालिका होत्या. यात कोल्हापूर, नरसोबाची वाडी, इचलकरंजी, ...

Development-wise Pethavdgaon Municipality | विकासाभिमुख पेठवडगाव नगरपालिका

विकासाभिमुख पेठवडगाव नगरपालिका

Next

सुहास जाधव।
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : जिल्ह्यात प्रथम १८८३-८४ साली फक्तचार नगरपालिका होत्या. यात कोल्हापूर, नरसोबाची वाडी, इचलकरंजी, कागल, आदींचा समावेश होता. यावेळी कोल्हापूर संस्थानातील उत्तरेकडील शेवटचे गाव म्हणजे पेठवडगाव असल्याने या गावावर लक्ष राहावे, तसेच उतार बाजारपेठेचा (कोकणनजीकची बाजारपेठ) विकास व्हावा या दृष्टिकोनातून कोल्हापूर संस्थानने वडगावास नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जाहीरनामा काढून १ आॅगस्ट १८८७ ला वडगाव नगरपालिकेची स्थापना केली. १३१ वर्षे होऊन गेलेल्या या नगरपालिकेने काळानुसार अनेक विकासकामे केली. मात्र, तलाव हस्तांतरण, सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक व उद्यान, संभाजी उद्यान, पाणीपुरवठा शुद्धिकरण केंद्र आदी विकासकामांचा यात उल्लेख करावा लागेल.
नगरपालिकेचा कारभार शासननियुक्तआठ सदस्य व गावातील प्रतिष्ठित आठ सदस्य पाहत होते. पालिका इमारत नसल्यामुळे मामलेदार कचेरीत बैठक घेण्यात येत होती. शासन नियुक्तसदस्यामार्फत १९२९ पर्यंत कारभार सुरू होता. दरम्यान, वडगाव शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी १८९० मध्ये राजर्षी शाहूंनी शहराजवळ महालक्ष्मी तलाव बांधला. २२० एकरांत हा तलाव आहे. तलावात ३१ फूट १ इंच पाणीसाठा मर्यादा आहे. १९२५ मध्ये पालिकेतील सदस्य संख्या १४ होती. यामध्ये लोकनियुक्तसात व शासन नियुक्तसात अशी होती. लोकनियुक्तसदस्य निवडून यावेत यासाठी वॉर्ड रचना करून निवडणूक घेतली होती. १९४८ साली कोल्हापूर संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. यावेळी १९२५ चा कायदा रद्द होऊन १९०१ हा कायदा लागू झाला. याप्रमाणे १९५२ रोजी निवडणुका झाल्या. या काळात दोन राजकीय पॅनेलचा जन्म झाला. यादव पॅनेल विरुद्ध वडगाव नागरी संघटना अस्तित्वात आली. यावेळी सोळा जागांसाठी निवडणूक होऊन यादव पॅनेलचे १५ सदस्य, तर विरोधी गटाचा एक सदस्य निवडून आला होता.
१९५७ साली फेरनिवडणुका झाल्या. या निवडणुकाही पारंपरिक यादव पॅनेल विरुद्ध वडगाव नागरी संघटना अशी निवडणूक झाली. त्यानंतर १९६२, १९६७, १९७४ अशा दुरंगी लढती झाल्या. १९८० ला प्रशासकीय कारकीर्द होती, तर १९८५ पालिकेच्या राजकारणात यादव आघाडीच्या विरोधात युवक क्रांती आघाडीचा उदय झाला. पालिकेच्या इतिहासात विजयसिंह यादव (१९७४), शिवाजीराव सालपे (२००१), मोहनलाल माळी (२०१७) यांना थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.

नगरपालिकेची विविध विकासकामे
महालक्ष्मी तलावाची निर्मिती, पाणीपुरवठा योजना सुरू, वडगावात न्यायालय होण्यासाठी पालिकेचा पाठपुरावा, पालिका इमारत बांधकाम व सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक व उद्यानाचे सुशोभीकरण, व्यापारी संकुले, दहावी परीक्षा केंद्र पाठपुरावा, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, विविध समाजमंदिरे, व्यायामशाळा, महालक्ष्मी वाचनालय, पालिकेचे बळवंतराव यादव हॉस्पिटल, जलतरण तलाव, छत्रपती संभाजी उद्यान सुशोभीकरण, महालक्ष्मी तलाव परिसराचे वेळोवेळी सुशोभीकरण, पाणीपुरवठा योजना तसेच अंतर्गत जलवाहिन्या, क्रीडांगण, दोन स्मशानभूमी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल पालिकेला पुरस्कार, ई-गव्हर्नरचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालिकेला पुरस्कार.

Web Title: Development-wise Pethavdgaon Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.