कोल्हापुरातील चित्रनगरीमधील विकासकामांना वेग, एप्रिलपर्यंत काम पूर्ण; चित्रीकरण वाढण्यास मदत होणार 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: December 25, 2023 02:27 PM2023-12-25T14:27:57+5:302023-12-25T14:28:10+5:30

इंदुमती गणेश कोल्हापूर : कोल्हापुरातील सिनेसृष्टीचे आशास्थान असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीतील विकासकामे झपाट्याने होत आहेत. एकाच वेळी येथे वाडा, चाळ, ...

Development work in Chitranagari in Kolhapur speeded up, work completed by April | कोल्हापुरातील चित्रनगरीमधील विकासकामांना वेग, एप्रिलपर्यंत काम पूर्ण; चित्रीकरण वाढण्यास मदत होणार 

कोल्हापुरातील चित्रनगरीमधील विकासकामांना वेग, एप्रिलपर्यंत काम पूर्ण; चित्रीकरण वाढण्यास मदत होणार 

इंदुमती गणेश

कोल्हापूर : कोल्हापुरातील सिनेसृष्टीचे आशास्थान असलेल्या कोल्हापूर चित्रनगरीतील विकासकामे झपाट्याने होत आहेत. एकाच वेळी येथे वाडा, चाळ, मंदिर आणि मोठ्या स्टुडिओची उभारणी होत आहे. पुढील चार महिन्यांत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत; यामुळे चित्रनगरीतील चित्रीकरण आणखी वाढण्यास मदत होणार आहे.

एकीकडे कोल्हापुरातील चित्रपट निर्मिती आणि चित्रपट व्यवसायाला उतरती कळा लागलेली असताना कोल्हापूर चित्रनगरी हे येथील चित्रपट व्यावसायिकांचे सर्वांत मोठे आशास्थान आहे. चित्रनगरीचा पूर्णत: विकास झाल्यानंतर एकाच वेळी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण येथे करता येणार आहे. पर्यायाने कोल्हापुरातील चित्रपटसृष्टीशी संबंधित सर्व व्यावसायिकांना पुन्हा सुगीचे दिवस येणार आहेत.

शिवाय एकेकाळी सिनेसृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरला काही प्रमाणात का असेना, गतवैभव मिळणार आहे. चित्रनगरीत सध्या काय चाललंय हे पाहण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधींनी चित्रनगरीला भेट दिली त्यावेळी तिसऱ्या टप्प्यातील विकासकामे झपाट्याने सुरू असल्याचे दिसले.

अमृतमहोत्सवांतर्गत विशेष कामे

आता तिसऱ्या टप्प्यात २० कोटींमध्ये सध्या चित्रनगरीच्या मागील माळावर भला मोठा वाडा, चाळ आणि भव्य स्टुडिओची उभारणी सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत चौथ्या टप्प्यात बंगला, रेल्वे स्टेशन आणि तीन हॉस्टेल हे लोकेशन्स उभारले जाणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील काम एप्रिलमध्ये संपल्यानंतर चौथ्या टप्प्यातील कामे सुरू होतील. तीन हॉस्टेलमध्ये चित्रीकरणासाठी येणाऱ्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

चित्रनगरीसाठी एकूण ५६ कोटींचा निधी

चित्रनगरीची २०१५ सालापासून टप्प्याटप्प्याने विकासकामे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात १२ कोटींमध्ये मुख्य स्टुडिओ व पाटलाच्या वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात १७ कोटींमध्ये अंतर्गत रस्ते, न्यायालय, दवाखाना, महाविद्यालय हे लोकेशन व सुसज्ज मेकअप रूम, पाण्याची सोय, लाइटिंग करण्यात आले. तिसरा टप्पा २० तर चौथा टप्पा साडेसात कोटींचा आहे. अशा रीतीने चित्रनगरीसाठी आत्तापर्यंत ४९ कोटी खर्च झाले आहेत. भविष्यात साडेसात कोटी रुपये मिळणार आहेत.

मार्केटिंगसाठी प्रांतिक चित्रपट महोत्सव

कोल्हापूर चित्रनगरीत एवढा मोठा स्टुडिओ, भव्य लोकेशन्स उभारले जात असताना त्याचे मार्केटिंग होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही कामे पूर्ण होतात. सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रांतिक चित्रपट महोत्सव करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील चित्रपट निर्माते व्यावसायिकांना निमंत्रित करून चित्रनगरीतील सोयीसुविधांची माहिती करून दिली जाणार आहे.

Web Title: Development work in Chitranagari in Kolhapur speeded up, work completed by April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.