कोल्हापुरातील रंकाळ्यावरील विकास कामांची गती वाढवावा : राजेश क्षीरसागर
By भारत चव्हाण | Published: August 11, 2023 04:05 PM2023-08-11T16:05:01+5:302023-08-11T16:05:45+5:30
सुशोभिकरणासाठी २० कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर होवून वर्षभराचा कालावधी उलटला
कोल्हापूर : रंकाळा संवर्धन व सुशोभिकरणासाठी २० कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर होवून वर्षभराचा कालावधी उलटला तरी कामाची गती संथ असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच कामे रखडली तर शासनाची बदनामी होणार आहे. म्हणूनच या कामात कोणतीही हयगय करू नका, अशा स्पष्ट सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
रंकाळा तलाव जतन व संवर्धन करण्याच्या कामास नगरविकास विभागाकडून ९.८४ कोटी, पर्यटन विभागाकडून ४.८० कोटी, जिल्हा नियोजन समिती मधून मिनिचर पार्क साठी २.५० कोटी, विद्युत रोषणाईसाठी ३.५० कोटी निधी मंजूर झाला आहे. या कामाची पाहणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी केली. कामाची माहिती शहर अभियंता हर्षजीत घाटगे यांनी दिला.
इतिहासास प्रथमच रंकाळा तलावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तलावाच्या माध्यमातून चांगला विकास करून शहराच्या पर्यटन वाढीस चालना देण्याचा उद्देश आहे. पुढील काळातही अधिकाधिक निधी आणून विकास करण्याची संधी आहे. अधिकाऱ्यांनी रंकाळा तलावाची कामे गांभीर्याने घ्यावीत, अशा सूचना क्षीरसागर यांनी दिल्या. कारंजा व संध्यामठ परिसरात सेल्फी पॉईंट उभारण्याच्या कामांचे प्रस्तावही तात्काळ तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या